कोलार येथे सिलिंडरचा स्फोट : सात लाखांचे नुकसान, शेळी होरपळलीवणी : तालुक्यातील कोलार पिंपरी येथे रविवारी सकाळी लागलेल्या आगीत दोन घरांची राखरांगोळी झाली असून आगीत सिलिंडरचा स्फोट होवून सिलिंडर ५० फूट उंच उडाले. या आगीत सात लाख रुपयांचे नुकसान झाले असून अग्नीशमन दलाच्या मदतीने गावकऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. संजय बापूराव साळवे यांच्या घरी मधुकर पिदूरकर कुटुंबीयांसह भाड्याने राहतात. रविवारी सकाळी ८ वाजता चहा करण्यासाठी पिदूरकर यांच्याकडील चूल पेटविण्यात आली. परंतु वारा वेगाने वाहात असल्याने चुलीतील ठिणगी उडाली आणि काही वेळातच घराला आग लागली. वाऱ्यामुळे ही आग बाजूचे महादेव अंड्रस्कर यांच्या घरालाही लागली. यावेळी घरातील मंडळी कसेबसे जीव मुठीत घेऊन बाहेर निघाले. त्याचवेळी अंड्रस्कर यांच्या घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. हा सिलिंडर ५० फूट उंच उडून बाजूच्या घरावर जावून पडला. परंतु घर स्लॅबचे असल्याने अनर्थ टळला.सिलिंडरच्या प्रचंड आवाजाने गावकरी घटनास्थळाकडे धावत आले. आग लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी पाण्याचा मारा सुरू केला. परंतु वारा वेगाने वाहात असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. वणी नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतु तोपर्यंत पिदूरकर व अंड्रस्कर यांच्या घरातील साहित्य भस्मसात झाले होते. या आगीत कपडे, अन्नधान्य, कुलर, फॅन, टीव्ही, होमथिएटर जळून खाक झाले. अंड्रस्कर यांच्या घरात मुलाच्या नोकरीसाठी असलेली महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली, तो लवकरच वेकोलिमध्ये रुजू होणार होता. अंड्रस्कर यांचे बँकेचे पासबूक आणि ५० हजार रुपये रोख जळाल्याची माहिती देण्यात आली. अंड्रस्कर यांचे चार लाखांचे तर पिदूरकर व घरमालक संजय साळवे यांचे तीन लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नाही. मात्र एक शेळी यात होरपळली गेली.याबाबत ग्रामपंचायत सदस्य हरिश पिदूरकर यांनी वणी पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी पोलीस निरीक्षक इवनाते यांना पंचनामा करण्यासाठी पाठविले. ही आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. (प्रतिनिधी)
आगीत दोन घरे बेचिराख
By admin | Published: May 23, 2016 2:27 AM