यवतमाळ : कळंब येथील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जिनिंगला मंगळवारी रात्री आग लागली. या घटनेत सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. वीज कोसळून ही आग लागल्याचे सांगितले जाते.
विवेक तिवारी यांच्या राजशांती इंडस्ट्रीजला ही आग लागली. या घटनेत कापसाच्या २०० गठाणी, १० टन कापूस, ३०० पोती सरकी जळून खाक झाली. यासोबतच संपूर्ण मशीनरीज व रॉ मटेरियल जळाले. फॅक्टरीचेही मोठे नुकसान झाले. या आगीमुळे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ही घटना सकाळी लक्षात आल्यानंतर आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. दुपारपर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, उत्तर भारतातील वेस्टर्न डिस्टबन्समुळे मंगळवारी सायंकाळी यवतमाळसह बाभूळगाव, कळंब, नेर, दिग्रस, पुसद या तालुक्यांत अवकाळी पाऊस कोसळला. बाभूळगाव तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून यामुळे हरभरासह तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.