मारेगाव : शासनातर्फे जंगल वाचवा वृक्ष लावा हा नारा सर्वत्र सुरू असतो. परंतु स्थानिक नागरिक आपल्या फायद्यासाठी वनांना आगी लावीत असल्याने वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागने जागृती करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंगर परिसर व जंगलाला आग लावणाऱ्या घटना घडत आहे. यामुळे वृक्ष व वन्यप्राण्यांचे मोठे नुकसान होत आहे. जंगलाला आग लावल्याने वन्यप्राण्यांची शिकार करणे सोपे जाते या हेतूने स्थानिक नागरिक जंगलाला आग लावतात. उन्हाळ्यात जंगल व डोंगराळ भागात काडी कचरा जाळला तर पावसाळ्यात गवत चांगले येते असा हेतू ठेवून या आगी लावल्या जाते. परंतु या वनव्यामुळे अलौकिक नैसर्गीक संपत्तीचे प्रचंड नुकसान होते याकडे मात्र लोकांचे लक्ष नसते. या आगीत जंगलातील छोटे वृक्ष जळून खाक होत आहे. तर अनेक मोठ्या वृक्षांना आगीच्या झळा लागून तेही खाली कोसळल्या जाते. जंगलामध्ये असलेले छोटे वन्यजीव यांना आपले प्राण गमवावे लागत आहे. शिकारिसाठी स्थानिक नागरिक जंगलाला एका बाजुने आग लावतात तर दुसऱ्या बाजुने वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी जाळे लावतात. वन्यप्राणी जिवाच्या आंकाताने जंगलातून पळ काढतात परंतु नागरिकांनी लावलेल्या त्या शिकारीच्या जाळ्यात ते फसतात. या आगीच्या घटनेत नुकताच करंजी-वणी या मार्गावरील दोन्हीही बाजू आगीने जळून खाक झाल्या. लाखो रुपये खर्च करून रस्त्यांच्या दोन्ही बाजूने लावलेले वृक्ष क्षणात जळून खाक झाली. तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान ही झाले. आगीने वनसंपत्तीचे होणारे मोठे नुकसान बघता वनविभागाने या आगी थांबवण्यासाठी जनजागृती करावी अशी मागणी वन्यप्रेमीकडून होत आहे. वनविभागाच्या जागेला आग लाऊन जंगली भाग नष्ट करायचा आणि त्या ठिकाणी अतिक्रमण करून शेती करायची असा हेतू ठेवून या आगी लावल्या जातात. जंगल संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी कडक कायद्याची अंमल बजावणी होणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)
मारेगाव तालुक्यात शिकारीसाठी लावली जाते जंगलात आग
By admin | Published: April 27, 2017 12:34 AM