सिलिंडरचा स्फोट : प्रसंगावधान राखल्यामुळे जीवित हानी टळली लोकमत न्यूज नेटवर्क दिग्रस : शहरातील गुरूदेव नगरात मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घराला अचानक आग लागली. या आगीत घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली आणि संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गुरूदेव नगरातील रहिवासी रेखा संजय काळे यांच्या घरात शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येते. आग वाऱ्यासारखी पसरून किचनपर्यंत पोहोचली आणि किचनमधील सिलेंडरलाही आगीने आपल्या कवेत घेतले. त्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला आणि संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यामुळे पंखा, कागदपत्रे, कपडे, पलंग, कपाट व इतर मौल्यावान वस्तू जळून खाक झाल्या. जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने घरातील संपूर्ण सदस्य दुसऱ्या खोलीत झोपले असल्याने प्रसंगावधान राखुन त्यांनी आपले प्राण वाचविले. नागरिकांनी व प्रशासने आगीवर नियंत्रण मिळविल्याने इतर घरांना हानी पोहोचली नाही. या घटनेचा तलाठी हगवणे यांनी पंचनामा केला असून, काळे कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, शासनाकडून त्यांना अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी होत आहे.
घराला आग, दोन लाखांचे नुकसान
By admin | Published: May 19, 2017 1:54 AM