विद्यार्थ्यांची ‘दिव्यप्रभा’ : ११ स्टॉलसह हस्तकला प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षकांचाही झाला गौरव यवतमाळ : दिव्यांग विद्यार्थी कसे शिकतात, त्यांना कसे शिकविले जाते, त्यांचे मित्र कसे मदत करतात, अशा अनेक अस्पर्शित बाबींवर प्रकाश टाकणारी दिव्यांगांची ‘शिक्षणाची वारी’ महाराष्ट्रात सर्वप्रथम यवतमाळात भरली. डायटच्या प्रांगणात शनिवारी झालेल्या या ‘दिव्यप्रभा’ कार्यक्रमाने उपस्थितांचे डोळे दीपविले. ‘शिक्षणाची वारी’ हा उपक्रम गेल्या दोन वर्षात अत्यंत यशस्वी झाला. मात्र, त्यात केवळ ‘नॉर्मल’ विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी कसे अध्यापन करावे, यावर भर होता. यवतमाळात पहिल्यांदाच अंध, कर्णबधीर, मूक, अध्ययन अक्षम, गतिमंद अशा विद्यार्थ्यांच्या यशोगाथा पुढे आणण्यासाठी ‘दिव्यप्रभा’ ही शिक्षणाची अनोखी वारी झाली. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डायट) तसेच समावेशित शिक्षण कक्षाच्या माध्यमातून ही वारी झाली. जिल्हाभरातील अपंग विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, फिरते विशेष शिक्षक यात सहभागी झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. दिव्यांगांसाठी उत्तम कामगिरी करणाऱ्या १६ शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अपंगांचे पालक, त्यांना मदत करणारे मित्र यांचाही सत्कार झाला. या शिक्षणाच्या वारीत ११ स्टॉल होते. शिवाय, दिव्यांगांच्या हस्तकला प्रदर्शनासह सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. (स्थानिक प्रतिनिधी) प्रत्येक जिल्ह्यात पोहोचणार ‘दिव्यप्रभा’ या ‘शिक्षण वारी’करिता अपंगांच्या यशोगाथांचे संकलन करण्यात आले. विशेष म्हणजे अपंग विद्यार्थ्यांनी स्वत:च लिहून काढलेला हा संघर्ष ‘दिव्यप्रभा’ नावाने वारीत प्रकाशित केला गेला. शेकडो यशोगाथांमधून निवडक ३० यशोगाथांचा समावेश असलेली ही ‘दिव्यप्रभा’ राज्यभरातील प्रत्येक शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. त्यातून अपंग विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकांनी काय काळजी घेतली पाहिजे, याचे मार्गदर्शन होणार आहे.
दिव्यांगांच्या शिक्षणाची पहिली वारी यवतमाळात
By admin | Published: May 01, 2017 12:18 AM