यवतमाळ : विदर्भातच नव्हे, तर नांदेडमध्येही नाही असे हायड्रोलिक निशाण यवतमाळच्या राजेंद्रनगरातील गुरुद्वारामध्ये उभे झाले आहे. ६५ फूट उंच असलेले हे निशाण आता वर्षातून तीनवेळा उतरवून त्याला चोला (कापड) साहेब चढविले जाणार आहे. दरम्यान, गुरु गोविंदसिंग यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वारा सिंग सभेच्यावतीने विविध कार्यक्रम घेतले जात आहे. बुधवारपासून १७ जानेवारीपर्यंत दररोज प्रभातफेरी काढली जाणार आहे.
या गुरुद्वारामध्ये ५० फूट उंचीचा निशाण साहेब उभारला गेला होता. आता याची उंची वाढविण्यासोबतच त्यावर हायड्रोलिक सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. ते खाली उतरवून त्यावर चोला चढविणे सोयीचे झाले आहे. गुरुनानक जयंती, बैसाखी आणि गुरु गोविंद सिंग जयंतीला हे निशाण उतरविले जाईल. यापूर्वी गुरुनानक जयंती आणि बैसाखीलाच निशाण उतरविल जात होते. गुरुद्वारा कुठे आहे हे लक्षात यावे याकरिता हे निशाण लावले जाते. काही ठिकाणी १५० फूटपर्यंत उंचीचे निशाण आहे. मात्र हायड्रोलिक सिस्टीमचे यवतमाळातच उभे झाले आहे.जबलपूर येथील ७० वर्षीय सरदार भुपेंदर सिंग यांनी ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. गुरुवारी (दि. १४ जानेवारी) सकाळी ७.३० वाजता हे निशाण खाली उतरवून त्यावर चोला चढविला जाणार आहे. या निशाणवर सर्वात वर टोकाला लावलेले दिवेही गुरुद्वारास्थळ चिन्हित करत आहेत. यासोबतच गुरुद्वारामध्ये ९० किलो वजनाचे शस्त्रचिन्ह (खंडा) उभे केले आहे. गुरुद्वारावर गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त केलेली रोषणाई लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.