पांढरकवडा : कामावर नेण्याच्या बहाण्याने दोघांनी एका महिलेला सोबत नेऊन तिला दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर तिला विष पाजण्यात आले. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिला पहाटे तिच्या घराजवळ आणून सोडण्यात आले. मात्र, तिची गंभीर अवस्था लक्षात घेऊन तिला यवतमाळ येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना तालुक्यातील पहापळ येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.
अण्णाराव भीमा धोत्रे (७३) व रामकिसन राजा शिंदे (५५) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर रत्नमाला महादेव आत्राम (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. ती पहापळ येथील रहिवासी आहे. २३ जून रोजी पहापळ येथील अण्णाराव धोत्रे व रामकिसन शिंदे या दोघांनी रत्नमालाला कामावर नेण्याच्या बहाण्याने सोबत नेले. दुपारनंतर तिला घरी आणून सोडले. पुन्हा सायंकाळी तिला सोबत नेले. या नराधमांनी तिला दारू पाजून पहाटे ४.३० वाजेपर्यंत तिच्यावर पाशवी अत्याचार केला. त्यानंतर तिला विषारी औषध पाजले.
त्यानंतर तिला बेशुद्ध अवस्थेत तिच्या घरी नेऊन सोडण्यात आले. मात्र शरीरात विष गेल्याने ती तडफडत असल्याचे काही लोकांच्या लक्षात आले. तिला लगेच पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने तिला यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. २६ जून रोजी तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करून सोमवारी १० जुलै रोजी अण्णाराव धोत्रे व रामकिसन शिंदे या दोघांनाही अटक केली. त्यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३०२, ३७६ ड व ॲट्राॅसिटी ॲक्ट अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.