पंचत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे नुकतेच निकाल जाहीर करण्यात आले. त्यात माहूर नगरपंचायतीने राज्यात १६वा, मराठवाड्यात दुसरा, तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ हवा व विविध क्षेत्रांत गेल्या वर्षभर केलेल्या सातत्यपूर्ण कामामुळे आणि पदाधिकारी, प्रशासकीय चमू, विविध सामाजिक संस्था, नागरिक यांच्या प्रयत्नांचे हे सांघिक यश असल्याचे मत मुख्याधिकारी विद्या कदम यांनी व्यक्त केले.
माहिती देताना कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, अभियंता प्रतीक नाईक, सुनील वाघ, भाऊ दळवे यांची उपस्थिती होती. यापूर्वी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत अनेक कठीण समस्यांना तोंड देत तत्कालीन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या कार्यकाळात २०१७ मध्ये एक कोटी रुपयांचे केंद्र शासनाचे पारितोषिक मिळविले आहे.