यवतमाळ : विदर्भातील कापसाला पर्यायी पीक म्हणून नावारूपास आलेल्या सोयाबीनचे गेल्या आठ वर्षांत पहिल्यांदाच प्रतिक्विंटल दर चार हजार ९५५ रुपयांवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांकडे अवघे २० ते २५ टक्के सोयाबीन शिल्लक असल्याने हे दर कमी होण्याची शक्यता नसून उलट साडेपाच हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
सोयाबीनचे एकीकडे उत्पादन घटले आहे, तर दुसरीकडे जागतिक बाजारात मागणीमध्ये दीडपट वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील सोयाबीनचा दर ९०० रुपये सेंटवरून १४०० रुपयांवर पोहोचला आहे. उत्पादन घटल्याने सोयाबीन तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. कुक्कुट व्यवसायातील खाद्य सोयाबीनच्या रॉ मटेरिअलपासून बनविले जाते. देशात कुक्कुट व्यवसाय वाढला असून ३० टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. पर्यायाने कुक्कुट व्यवसायातील खाद्याची मागणीही त्याचपटीने वाढली. या सर्व बाबींचा परिणाम सोयाबीनचे दर वाढण्यावर झाला आहे. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ३८०० ते ४९५५ एवढा दर बाजारात आहे. यापूर्वी २०१२ मध्ये हा दर साडेपाच हजारांवर गेला होता. त्यानंतर आठ वर्षांनी आता एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची दरवाढ झाली. शेतकऱ्यांकडे अजूनही २० ते २५ टक्के सोयाबीन शिल्लक आहे. बाजारातील तेजीचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे मानले जाते.
उत्पादनातील घट आणि जागतिक बाजारपेठेतील मागणी वाढल्याने सोयाबीनचे दर वाढले आहेत. त्याचा सोयाबीन शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांना फायदा होईल. हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- विजय मुंधडा, संचालक, खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती, यवतमाळ