लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: उमरखेड येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी सकाळी मृत्यू झाला. ही महिला काही दिवसापूर्वी मुंबईवरून आल्याची माहिती आहे. तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणात असताना तिचा स्वाब तपासणीला पाठविला होता. काल शुक्रवारी ती पॉझिटिव्ह असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाचा हा पहिला मृत्यू आहे.या मृत्यूने प्रशासन व आरोग्य यंत्रणा हादरली आहे, अद्याप या मृत्यूची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
कमलाबाई सुधाकर राठोड रा. नागापूर ता. उमरखेड असे मृत महिलेचे नाव आहे. ती कुटुंबियासह पंधरा दिवसापूर्वी मुंबई येथून गावी आली होती. तिला गावात शाळेमध्ये विलगीकरण आत ठेवले होते. गुरुवारी तिची प्रकृती बिघडल्याने तिला उमरखेडच्या खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तेथील डॉक्टरांनी महिलेला पुसद येथे नेण्याचा सल्ला दिला. पुसदच्या खाजगी डॉक्टरने लक्षणे पाहून त्या महिलेला कोव्हीड केअर सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तेथील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष पवार यांनी सदर महिलेला व तिच्या पतीला तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात पाठविले. तिचा नमुना शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. दरम्यान शनिवारी उपचार सुरू असताना सकाळी या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेच्या पतीची प्रकृती स्थिर आहे. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. मृत महिला मुंबईवरून गावी येत असताना तिच्या संपर्कात २१ जण आले आहेत. हे सर्वजण नागापूर गावातील शाळेमध्ये असलेल्या विलगीकरण कक्षात थांबले होते.
यवतमाळ जिल्ह्यात पॉजिटिव्ह रुग्णांचा आकडा 125 पर्यंत गेला असून यापैकी 99 जण बरे होऊन घरी गेले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यु झाला नव्हता, मात्र आज एका महिलेचा मृत्यु झाल्यामुळे जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबधित रुग्णाच्या मृत्युची नोंद झाली आहे. मृत झालेल्या या महिलेच्या प्रकृतिवर डॉक्टरांचे सुरवातीपासून अतिशय काळजीपूर्वक लक्ष होते. तिला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी मध्य रात्रीपासून शर्तीचे प्रयत्न केले. मात्र अखेर श्वसनाच्या त्रासामुळे तिचा मृत्यु झाला. जिल्ह्याच्या नागरिकांना विनंती आहे की, कोरोना संदर्भात काही लक्षणे दिसताच त्यांनी जवळच्या कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि शासकीय आरोग्य संस्थेत जावून तपासणी करून घ्यावी. किंवा टोल फ्री नंबर वर संपर्क करावा. जेणेकरून बाधित रुग्णावर उपचार करणे सोयीचे होईल. नागरिकांनी याबाबत कोणताही निष्काळजीपणा करू नये. तसेच जिल्ह्यात पहिल्या मृत्युची नोंद झाल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सर्व आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.मुंबईवरून आलेला आणि सुरवातीपासून संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती असलेल्या एका जणाचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एक्टिव पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 25 आहे.