३० लाखांचे नुकसान : पुसदच्या तुकाराम बापू वॉर्डातील घटना पुसद : येथील तलाव ले-आऊट परिसरातील तुकाराम बापू वॉर्डात लागलेल्या आगीत सात घरांसह फर्निचर मार्ट भस्मसात झाले. ही आग मध्यरात्रीच्या सुमारास लागली असून, यात अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिक व अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल चार तासानंतर आग आटोक्यात आली. येथील तुकारामबापू वॉर्डातील घरांना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता-पाहता या आगीने रौद्ररुप धारण केले. त्यात शेख हसन शेख अहेमद, शेख हुसेन शेख अहेमद, बाबा शेख बुडन, फिरोज शेख बुडन, शांताबाई हिरामण ठोके, गंगाबाई बाबूराव ठाकरे, राजू बाबूराव ठाकरे यांच्या घरांची राखरांगोळी झाली. तर सैयद इसाक सैयद हुसेन यांचे फर्निचर मार्टही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. आग लागल्याचे दिसताच या घरातील मंडळींनी आपल्या अंगावरील कपड्यानिशी बाहेर धाव घेतली. या घटनेची माहिती पुसद अग्निशमनदलाला देण्यात आली. पुसदचा बंब घटनास्थळी दाखल झाला परंतु आगीचे रौद्ररुप पाहून उमरखेड, वाशीम, दारव्हा येथून अग्निशमनदलाला पाचारण करण्यात आले. दरम्यान एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने या आगीने रौद्ररुप धारण केले. तब्बल चार तासाच्या प्रयत्नानंतर आग पहाटे आटोक्यात आली. या आगीत गौतम जाधव यांच्या फायबरच्या खुर्च्या, एक सायकल रिक्षा, विशाल जाधव यांच्या खुर्च्या, गंगाबाई यांच्या मालकीचा पानठेला, ऊसाच्या रसाचा गाडा भस्मसात झाला. आगीची माहिती मिळताच नगरपरिषदेचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक भारत जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, डॉ. अजय कुरवाळे यांनी धाव घेतली. ही आग विझविण्यासाठी सोहेल खाँ, रवी कारंजकर, रेहान खान, शेख मोहसीन, नागेश गायकवाड, राजू ठाकरे, राज खान, विशाल जाधव, विशाल वाघमारे, शेख गुरू, शंकर गजभार, अभिजीत गुरकुले, उमेश चरापंडे, जय कांबळे, अरविंद वाघमारे, शेख अशफाक यांनी परिश्रम घेतले. आग विझवताना यातील काही तरुण जखमी झाले. या आगीत नेमके किती नुकसान झाले याचे सर्वेक्षण मंडळ अधिकाऱ्यांच्यावतीने बुधवारी दुपारी सुरू झाले. (कार्यालय चमू)
आगीत सात घरांसह फर्निचर मार्ट बेचिराख
By admin | Published: March 23, 2017 12:25 AM