लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील नगरपालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत कचºयाच्या निविदेवरून झालेल्या खडाजंगीनंतर भाजपाच्या उपाध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी सभात्याग केला. येथील नगरपालिकेत भाजपाची सत्ता स्थापन झाल्यानंतर सत्तेतील पदाधिकाऱ्यांनी सभात्याग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष असे दोन गट पडले असून विकासकामाच्या मुद्यावरून या दोन गटात तीव्र मतभेद झाले आहेत. गटबाजीमुळे पालिकेचे राजकारण चांगलेच ढवळून निघत आहे.नगरपालिकेची सर्वसधारण सभा शुक्रवारी दुपारी १२ वाजता पालिकेच्या सभागृहात सुरू झाली. या सभेत ११ विविध विषयांसह अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार होती. मागील सभेचे ईतिवृत्त वाचून ते कायम केल्यानंतर दुसरा विषय पटलावर येताच, सत्तेतील नगरसेवकांपैैकी राकेश बुग्गेवार यांनी शहरातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे सांगत एक कोटी १७ लाख ७९ हजार ८३३ रूपयांचे कचºयाचे वार्षिक कंत्राट देऊनही शहरात घाणीचे सम्राज्य का आहे, असा प्रश्न मुख्याधिकाºयांना विचारला. मागील वर्षी हेच कंत्राट सहा लाख ६६ रुपये प्रतिमाह दराने देण्यात आले होते. यावर्षी दर का वाढवून देण्यात आले, या आणि अशा अनेक प्रश्नांचा भडीमार केला. त्यावर नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी नगरसेवकाची बाजू न घेता, उलट नगरसेवकांनाच चूप बसण्यास सांगितले, असा आरोप नगरसेवक राकेश बुग्गेवार यांनी केला आहे. या मुद्यावरून सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर पालिकेचे उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, राकेश बुग्गवार, संतोष डंभारे, धीरज पाते, विजय मेश्राम या पाचजणांनी संतप्त होऊन सभात्याग केला. मात्र त्यानंतरही सभा सुरळीत पडून अनेक ठराव पारित करण्यात आले.तहसील चौकाला अहल्याबाई होळकरांचे नावशुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत वणी शहरातील तहसील चौकाला राजमाता अहल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा ठराव पारित करण्यात आला. नगरसेवक नितीन चहानकर यांनी याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना निवेदन दिले होते. त्यांच्या मागणीची दखल घेत तहसील चौकाला राजमाता अहल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा ठराव पारित करण्यात आला. यासोबतच शहरातील लक्ष्मीनगर येथील चौकाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्याचा ठरावही यावेळी घेण्यात आला. जो कुणी नगरपरिषदेचा कर भरेल, त्याला कचरा साठविण्यासाठी व कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी एक हिरवी व एक निळी बकेट पालिकेच्यावतीने देण्यात येणार आहे.खरे तर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, आम्ही समस्या मांडल्यानंतर नगराध्यक्षांनी आमची बाजू घेत मुख्याधिकाऱ्यांना त्याबाबतचा जाब विचारणे अपेक्षित होते. मात्र घडले उलटेच नगराध्यक्षांकडून आमचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. हा अपमान सहन न झाल्याने मी व भाजपाच्या पाच नगरसेवकांनी सभात्याग केला.- श्रीकांत पोटदुखेउपाध्यक्ष, नगरपरिषद वणीअजेंड्यामध्ये असलेले विषय नियमानुसार अगोदर पटलावर घेणे गरजेचे असते. सभेत गोंधळ झाल्याने विकास थांबतो. तो होऊ नये म्हणून अगोदर अजेंड्यावर असलेले विषय घेतले. मात्र अजेंड्यावर नसलेल्या विषयावर चर्चा सुरू झाल्याने मी संबंधित नगरसेवकाला या विषयावर नंतर चर्चा करू असे सांगितले. मात्र त्याही उपरांतही त्यांनी सभात्याग केला.- तारेंद्र बोर्डेअध्यक्ष, नगरपरिषद वणी
उपाध्यक्षांसह पाच नगरसेवकांचा सभात्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:57 PM
येथील नगरपालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत कचºयाच्या निविदेवरून झालेल्या खडाजंगीनंतर भाजपाच्या उपाध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी सभात्याग केला.
ठळक मुद्देवणी पालिकेची सर्वसाधारण सभा : कचऱ्याच्या निविदेवरून आपसातच खडाजंगी