लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वेकोलीच्या कोळसा खाणींसह विविध उद्योग असलेल्या वणी तालुक्यातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. वाढते अपघात व गंभीर आजार लक्षात घेता, तीन लाख नागरिकांच्या आरोग्याची धुरा केवळ पाच डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, यासाठी अनेकदा आंदोलने झाली. आश्वासनही मिळाले. परंतु, उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या प्रक्रीयेला अद्याप वेग आलेला नाही. उपजिल्हा रूग्णालया संदर्भातील प्रस्ताव स्थानिक पातळीवरून पुढे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप प्रक्रीयेला हवी तशी गती मिळाली नाही. वणी तालुक्यात १२ पेक्षा अधिक कोळसा खाणी आहेत. यासोबतच अनेक उद्योगदेखील आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर दळणवळण सुरू असते. यातून अपघातही घडतात. या भागात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. धूळ प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. असे असताना वणीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज अशी शासकीय आरोग्य यंत्रणा असणे अत्यंत गरजेचे आहे. किमान १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास या भागातील रुग्णांना बऱ्यापैकी दिलासा मिळू शकतो. सद्य:स्थितीत वणी ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अतिशय बिकट आहे. अपघातातील रुग्ण अथवा गंभीर आजाराच्या रुग्णांवर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर त्यांना चंद्रपूर किंवा यवतमाळ येथे रेफर करण्याचा सल्ला स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडून दिला जातो. यामुळे बऱ्याचदा उपचारासाठी चंद्रपूर किंवा यवतमाळकडे निघालेल्या रुग्णाचा वाटेतच मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान वणी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटरसह नऊ डॉक्टर कार्यरत होते. त्यातील दोन डॉक्टर नियुक्ती झाल्यानंतर रूजूच झाले नाहीत, तर कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर दोन डॉक्टरांना नारळ देऊन घरी पाठविण्यात आले. सद्य:स्थितीत येथे केवळ पाच डॉक्टर कार्यरत आहेत.
रुग्णालयाच्या पाऊण एकर जागेवर अतिक्रमण - जवळपास साडेसहा एकरच्या परिसरात वणीचे ग्रामीण रुग्णालय उभे आहे. मात्र, यापैकी जवळपास पाऊण एकरवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रामीण रुग्णालय स्तरावर पत्रव्यवहार झाले आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची मोजणी करून घेण्यासाठी पैसेही भरण्यात आले. मात्र, अद्याप जागेची मोजणीच करून देण्यात आली नाही. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.