यवतमाळ : सरकारी कर्मचारी दिवाळीत बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी शहरात एकाच रात्री तब्बल पाच घरफोड्या केल्या. यामध्ये चोरट्यांनी दोन लाखांच्यावर ऐवज लंपास केला आहे.
दिवाळी सणानिमित्त नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी महागाव शहरात धुमाकूळ घातला. आमणी (खुर्द) रस्त्यावरील संभाजी लेआउटमध्ये चार ठिकाणी घरफोड्या करून मुद्देमाल लंपास केला; तर बाजूलाच आमणी (बु.) रस्त्यावरील गिरिजानगरात एका ठिकाणी घरफोडी करण्यात आली.
रूपेश देशमुख यांच्या फ्लॅटमध्ये मारोतराव तमन्ना हे शिक्षक भाड्याने राहतात. बाजूलाच सतीश चौधरी यांचे घर असून, शिक्षक दत्तात्रय जंगमवाड तेथे भाड्याने राहतात. दिवाळीत हे कुटुंब मूळगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी डल्ला मारला. चांदीचे दिवे, चिल्लर नाणी व काही रक्कम चोरट्यांनी पळवली. गिरिजानगरमधील अवधूत साबळे हे शिक्षक दिवाळसणाला वडद या मूळगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांचे घर फोडून दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळविले.
दत्तराव काळसरे यांच्या घरी स्टेट बँकेचे कर्मचारी आगम भाड्याने राहतात. त्यांचेही घर चोरट्यांनी फोडले. पाच ठिकाणी घरफोड्या करून चोरट्यांनी दोन लाखांच्या वर ऐवज लंपास केला. या संदर्भात अवधूत साबळे यांनी महागाव पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी सकाळीच घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
घर सोडून बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून आपला ऐवज, पैसे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत किंवा सोबत घेऊन जावेत. शेजाऱ्यांनासुद्धा बाहेर जात असल्याचे कळवावे. जमल्यास सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यावेत. आम्ही तर नागरिकांच्या सेवेत आहोतच; पण आपला ऐवज, पैसे जपण्याची नागरिकांचीही जबाबदारी आहे.
- विलास चव्हाण, ठाणेदार, महागाव