बियाणे कंपन्यांकडून दरात वाढीची मागणी होती. नॅशनल सीड असोसिएशनने केंद्र सरकार स्तरावर त्यासाठी पाठपुरावा केला. सध्या बीजी- १ तंत्रज्ञान रॉयल्टीविना उपलब्ध करून दिले जात आहे. बीजी- २ वरील रॉयल्टीची आकारणी मात्र कायम आहे. गेल्या वर्षींच्या हंगामात बीजी-१ कपाशी बियाण्याचे पाकीट ६३० रुपयांना, तर बीजी-२ चे पाकीट ७३० रुपयांना विकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
यावर्षी बीटी बियाणे पाकीट दरात सरासरी पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. आता बीजी-१ बीटी पाकीट ६३५ रुपयांना, तर बीजी-२ पाकिटांची किंमत ७६७ रुपये करण्यात आली आहे.
बियाणे कंपन्यांकडून दरवाढीचे स्वागत करण्यात आले. या माध्यमातून संशोधन आणि विकास कार्यासाठी पैसा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावर तालुक्यातील ज्येष्ठ कापूस अभ्यासक व ‘अमृत पॅटर्न’चे जनक अमृतराव देशमुख यांनी महाराष्ट्रात ४२ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होते असे सांगून त्यात ९५ टक्के बीटी बियाणे असल्याचे स्पष्ट केले. एकरी दोन पाकिटांची गरज राहते. त्यानुसार सरासरी १ कोटी ५० लाख पाकिटे महाराष्ट्रात विकली जातात. गेल्या वर्षी ३५ लाख पाकिटे हरबींसाइड टॉलरंट (तणाला प्रतिकारक) बियाण्याची अनधिकृतपणे विकली गेली, अशी माहिती त्यांनी दिली. त्याचा बियाणे कंपन्यांना मोठा फटका बसला. नव्या दरवाढीमुळे कंपन्यांना दिलासा मिळाला असला, तरी कापूस उत्पादन खर्चात मात्र वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून बोंडअळी आल्याचे कृषी विद्यापीठातील संशोधक सांगतात. मात्र, बोंडअळी नाही तर ती बोंड सड आहे, हे वास्तव कृषी विद्यापीठाचे अधिकारी मानायला तयार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. त्यांचे पिकाबाबतचे आकलन कमी पडत असल्यामुळे स्वतःचे अज्ञान लपवण्यासाठी विद्यापीठाचे तंत्रज्ञ माझ्यासारख्या कृषी संशोधकाला खोटं ठरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला. मी केलेल्या सूचना महाराष्ट्र शासन वगळता गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आदी राज्यांनी स्वीकारल्या. कोणताही सामान्य शेतकरी पिकाचे एवढे सूक्ष्म नियोजन करू शकत नाही. त्या संधीचा लाभ घेऊन कृषी विद्यापीठाचे अधिकारी, स्थानिक कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या माथी अपयशाचे खापर फोडत आले आहे. कपाशी आणि सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी बोगस बियाणे व आलेल्या रोगामुळे प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. रोगाचे योग्य निदान होत नाही. कापूस पेरा कमी होणे हे राष्ट्राच्या हिताकरिता चांगले नाही. मात्र, दुर्दैवाने तो कमी होताना दिसत आहे. हे अपयश कृषी विभागाचे असल्याचा आरोप अमृतराव देशमुख यांनी केला आहे.
बॉक्स
तालुक्याला यंदा लक्ष्यांक मिळणार
कपाशी हे पीक खर्चिक पीक झाले आहे. सोयाबीनवर येणारे रोग पाहता शेतकऱ्यांचा कल अन्य पिकांकडे वळला आहे. उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. कोरोनामुळे कृषी विभागाला लक्ष्यांक देण्यात आले नव्हते. यंदा ते मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांनी सांगितले.