अश्लील चाळे : एसडीपीओंच्या पथकाची दारव्हा रोडवर कारवाईयवतमाळ : येथील दारव्हा मार्गावर एका व्यापारी संकुलातील सायबर कॅफेमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना सोमवारी दुपारी आढळून आले. उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या पथकाने धाड टाकून सायबर कॅफेआड सुरू असलेला अश्लील व्यवसाय उघडकीस आणला. शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीचे प्रेमप्रकरण कुटुंबियांना माहीत झाले. तिचा प्रियकर तिच्या इच्छेविरुद्ध तिला शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करीत असल्याने तिने सोमवारी सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी नेमका काय प्रकार आहे, याची सखोल चौकशी केली. तेव्हा तिने सांगितले की, दारव्हा मार्गावर असलेल्या एका सभागृहासमोरच्या हॉटेललगत व्यापारी संकुलात ‘निस्क’ सायबर कॅफे आहे. तिथे तिच्या प्रियकराने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबियांनी हे सायबर कॅफे गाठले. तिथे त्यांना तो प्रियकर दिसला नाही. मात्र इतर पाच मुले-मुली नको त्या अवस्थेत आढळून आले. या प्रकाराची माहिती एसडीपीओ पीयूष जगताप यांना मिळाली. त्यांचे पथक व लोहारा पोलिसांनी संयुक्त धाड टाकून पाच मुले व पाच मुली यांना ताब्यात घेतले. या सायबर कॅफेमध्ये केवळ एकच संगणक आहे. लांब पडदे लावून कॅबीन बनविण्यात आल्या आहेत. तिथे प्रेमीयुगुलांना एकांत उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय चालत होता. त्यासाठी तासाला २०० ते ५०० रुपयापर्यंत शुल्क आकारले जात होते. मागील अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा या परिसरात सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोलीस कारवाईदरम्यान येथे आढळलेल्या मुला-मुलींच्या अंगावर कपडेसुद्धा नव्हते. हा प्रकार माहीत झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सायबर कॅफे चालक निखील उजवणे याला चोप देण्याचा प्रयत्न केला. तसेच सायबरची तोडफोडही करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तत्काळ सायबर चालकासह पाच मुलांना लोहारा पोलीस ठाण्यात पाठविले. तर मुलींना एसडीपीओ कार्यालयात पाठविण्यात आले. या मुला-मुलींविरोधात पोलिसांच्या तक्रारीवरूनच कारवाई केली जाणार आहे. त्यांच्या विरोधात मुंबई पोलीस कायद्यातील कलम ११०, ११७ नुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्याचा गुन्हा नोंदविला जाणार आहे. तर सायबर कॅफे चालक निखील उजवणे विरोधात सायबर कॅफेचे परवानगी तपासून कारवाई केली जाणार आहे. या उजवणे बंधूंनी यापूर्वी मेडिकल कॉलेज परिसरात सायबर कॅफे थाटला होता. तेथेही तत्कालीन एसडीपीओ पथकाने कारवाई करून अश्लील प्रकार उघडकीस आणला. (कार्यालय प्रतिनिधी) सायबर कॅफे नव्हे, प्रेमीयुगुलांचा अड्डाविविध महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शहरातील काही सायबर कॅफेंना अड्डाच बनविले आहे. एकांताच्या शोधात असलेले अनेक जण या सायबर कॅफेत वेळ घालवितात. त्यासाठी घसघशीत पैसे दिले जाते. त्यामुळे हा अनधिकृत व्यवसाय आर्णी मार्गावरही मोठ्या प्रमाणात आहे. येथील एका मंगल कार्यालयालगतच्या सायबर कॅफेतही असाच प्रकार सुरू असतो. पालकांना इंटरनेटवर काम असल्याचे सांगून या प्रेमीयुगुलांकडून धूळ फेक केली जाते. अगदी कमी वयात शारीरिक संबंधापर्यंत त्यांची मजल पोहोचली आहे.
‘सायबर कॅफे’वरील धाडीत पाच विद्यार्थी जोडप्यांना अटक
By admin | Published: April 18, 2017 12:03 AM