लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथून जवळच असलेल्या मांडवी शिवारात पाच वाघांचा संचार असल्याने परिसरातील शेतकरी दहशतीत सापडले आहे. २७ व २८ जानेवारीला लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पाच वाघ कैद झाले असून त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. याबाबत रेंजर एस.बी.मेहेरे यांना विचारणा केली असता, त्यांनी सदर छायाचित्र खरे असून मांडवी-जुनोनी शिवारात पाच वाघांचे अस्तित्व असल्याचे त्यांनी मान्य केले.
या पाच वाघांमध्ये वाघिण व तिचे चार बछडे आहेत. यात दोन मादी, तर दोन नर वाघ असल्याचे त्यांनी सांगितले. पाच वाघांचा संचार चाटवण नाल्याच्या दोन्ही बाजूने असल्याने मांडवी, जुनोनी, पिवरडोल शिवारातील शेतकरी दहशतीत आहे. रेंजर मेहेरे यांनी सांगीतले की, आपण स्वत: वनपाल बी.एम.वाघाडे तथा वनरक्षक, वनमजुरांची टीम या भागात कार्यरत असून ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेऱ्याद्वारा मॉनिटींग सुरू आहे.
शनिवारी उपवनसंरक्षक किरण जगताप यांनी परिसराची पाहणी केली असून संपूर्ण यंत्रणा लक्ष ठेवून आहे. नाल्याला पाणी आहे. पाळीव प्राणी व रोही, रानडुकरासारखे वन्यप्राणी असल्याने वाघांचा वावर असल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू असून त्याकरिता वनमजुरांची संख्या वाढविण्यात आली आहे. हे वाघ माणसाळलेले असून आतापर्यंत मानवावर हल्ला केल्याचे निदर्शनास आले नाही, असेही मेहेरे यांनी सांगितले.