नाल्याला पूर : ६० जणांना पाणी उतरण्याची प्रतीक्षा राळेगाव : नाल्याला आलेल्या पुरामुळे पाच गावांचा राळेगावशी संपर्क तुटला आहे. कामानिमित्त राळेगाव येथे आलेल्या ५० ते ६० जणांना आपल्या गावी जाण्यासाठी पूर उतरण्याची प्रतीक्षा आहे. वाऱ्हा आणि मेंगापूर मार्गावर असलेल्या नाल्याला आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वाऱ्हा, लिंगापूर, आष्टा, सगना, संगम, बोरी या गावातील नागरिकांचा राळेगावशी संपर्क तुटला आहे. यातील काही गावातील ५० ते ६० नागरिक राळेगावकडे अडकून पडले आहे. त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था तालुका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तहसीलदार हेमंत गांगुर्डे हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. शनिवारी दुपारपासून राळेगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. आधीच दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यांना या पावसामुळे पूर आला. चार ते पाच फूट पाणी पुलावरून वाहत आहे. यामुळे सदर गावातील काही कामानिमित्त राळेगाव येथे आलेले नागरिक अडकून पडले आहे. पूर आलेला नाला राळेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. पाऊस थांबल्याने पूर ओसरणे सुरू झाले होते. मात्र अडकून पडलेल्या नागरिकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था तालुका प्रशासनाकडून केली जात आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्याच्या काही भागातील शेतामध्ये पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने पिके पिवळी पडून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी) धनोडा येथे पैनगंगेत एक जण वाहून गेला धनोडा : पैनगंगा नदीत पोहण्यासाठी उतरलेला एक जण वाहून गेल्याची घटना शनिवारी दुपारी ५.४५ वाजता घडली. उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. दरम्यान, या घटनेची तक्रार माहूर पोलिसात देण्यात आली आहे.एका चारचाकी वाहनाने माहूरकडे जात असलेले १२ ते १३ जण पैनगंगा नदीजवळ थांबले. यातील दोघांनी पोहण्यासाठी बंधाऱ्यावरून नदीमध्ये उडी घेतली. यातील एक जण बाहेर निघाला. दुसरा मात्र वाहून गेला. बराच वेळपर्यंत त्याचा शोध लागला नाही. अखेर सोबतच्या लोकांनी माहूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सदर वाहनातून आलेले नागरिक दारव्हा परिसरातील असल्याचे सांगितले जात होते. (वार्ताहर)
पाच गावांचा राळेगावशी संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2016 12:39 AM