पुसद (यवतमाळ) : पाच वर्षांच्या बाळाने चक्क एक रुपयाचे नाणे गिळले. ते १५ दिवसांनंतरही निघाले नाही. त्यामुळे अत्यंत अस्वस्थ झालेल्या या बाळाच्या पोटातून अखेर डाॅक्टरांनी कोणतीही शस्त्रक्रिया न करता हे नाणे बाहेर काढले.
सार्थक ज्ञानेश्वर चव्हाण (वय ५ वर्ष) रा.वाघजाळी असे या बाळाचे नाव असून, पुसदच्या मेडिकेअर हॉस्पिटलच्या चमूने ही कामगिरी केली. सार्थकने एक रुपयाचे नाणे गिळले होते. त्यामुळे आईवडिलांनी पोटाच्या त्रासासाठी त्याला उपचारासाठी पुसद येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मुलाने नाणे गिळल्यानंतर घरातील सर्वांनी नाणे पुढे सरकून शौचाद्वारे निघून जाईल, असा सल्ला दिला, पण १० दिवस झाले, तरी नाणे शौचाद्वारे निघाले नाही. त्यामुळे मुलाला रुग्णालयात आणले गेले. त्याला सारखे पोट दुखणे, अधून मधून उलटीचा त्रास रोज होत होता. डाॅक्टरांनी त्याला बेशुद्ध करून इन्डोस्कोपीद्वारे नाणे काढण्याचे ठरविले. अखेर डॉ.वीरेन पापळकर व डॉ.विक्रांत लोहकरे यांच्या चमूने काहीही चिरफाड न करता, यशस्वीरीत्या मुलाच्या पोटातील नाणे काढले. लगेच दुसऱ्या दिवशी बाळाला सुखरूप सुट्टीही देण्यात आली. बधिरीकरण तज्ज्ञ डॉ.ललित जाधव व त्यांच्या चमूने यशस्वीरीत्या बधिरीकरणाची प्रक्रिया सांभाळली. नाणे जठरात अडकून फसले होते. त्याला मोकळे करून एका विशिष्ट फोरसेफ उपकरणाने नाणे काढण्यात आले, असे डॉ.वीरेन पापळकर यांनी सांगितले.