फोटो
उमरखेड : तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या दराटी गावालगत असलेला तलाव मुसळधार पावसामुळे पूर्णपणे भरला. तलावाच्या आऊटलेटमधून येणाऱ्या पाण्यामुळे बुधवारी शिवाजीनगर तांड्याला पुराचा वेढा पडला. तेथील १०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
तलाव भरल्याने गावालगतच्या नाल्याला पूर आला. पुराचे पाणी शिवाजीनगर २ मधील तांड्यातील शेकडो घरात शिरले. त्यामुळे १०० कुटंबातील महिला, पुरुष, मुलांना गावातील नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी हलविले. त्यामुळे प्राणहानी टळली. परंतु, त्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्यासह वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. तालुक्यात पैनगंगा अभयारण्य असल्यामुळे जंगलाचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. या जंगलातील पूर्ण पाणी दराटी गावालगत असलेल्या तलावात येते. आता तलाव पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून तलावातील आऊटलेटमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत होते. ते पाणी नाल्यात आल्याने पूर वाढत गेला.
गुरुवारी पहाटे ५ वाजेपासून पुराचे पाणी शिवाजीनगर तांडा क्रमांक दोन मधील १५० कुटुंबांची वस्ती असलेल्या घरात शिरणे सुरु झाले. नागरिक झोपेत असतानाच पुराचे पाणी घरात शिरले. पाहता पाहता अवघ्या एका तासातच पुराने संपूर्ण तांड्याला वेढा घातला. त्यामुळे महिला, मुले, पुरुष जीव मुठीत धरून एकमेकांचा आधार घेत बाहेर पडून बाजूच्या तांड्यात सुरक्षित स्थळी पोहोचले.
बॉक्स
पहाटे एक तासातच सर्व घरांत पाणीच पाणी
तलावाच्या पाण्यामुळे पुराने रौद्र रूप धारण केले. गुरुवारी सकाळी ६ वाजेपासून १०.३० वाजेपर्यत सर्व घरांतून पुराचे पाणी वाहू लागले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूर ओसरला. यात जीवित हानी झाली नाही. परंतु संसारोपयोगी साहित्याची हानी झाली.
कोट
दराटी येथील शिवाजीनगर तांडा क्रमांक २ मधील सर्व कुटुंब सुरक्षित स्थळी हलविले. त्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था गावातील तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील करीत आहे. पुराच्या पाण्यामुळे जीवित हानी झाली नाही. परंतु पाणी घरात गेल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले. तलाठ्यामार्फत पंचनामे करणे सुरू आहे.
आनंद देऊळगावकर, तहसीलदार, उमरखेड