यवतमाळ : बुधवारी रात्रीच्या दमदार पावसानंतर गुरुवारी सकाळीही पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने यवतमाळसह जिल्ह्यातील राळेगावसह कळंब, वणी, घाटंजी आदी तालुक्यांत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली होती. याचदरम्यान यवतमाळ शहरातील बांगरनगर परिसरात नाल्यात तोल जाऊन पडलेली महिला वाहून गेली.
बुधवारी रात्रभर यवतमाळसह जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस कोसळला. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३९.४ मि. मी. पावसाची नोंद झाली. कळंब तालुक्यात अतिवृष्टी नोंद झाली असून सर्वाधिक ११३ मि.मी. पाऊस पडला. वणीमध्ये ७८.८, केळापूर ७२.४, राळेगाव ८६.५, मारेगाव ५५, घाटंजी ३६, तर यवतमाळ तालुक्यात ३५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. गुरुवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम असल्यामुळे जिल्ह्यातील सखल भागांत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. कळंब येथे चक्रावती नदीला पूर आल्याने नदीकाठच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. अशीच स्थिती तालुक्यातील जोडमोहा येथेही अडाण नदीच्या पाण्यामुळे निर्माण झाली.
अनेक भागांत पुराचे पाणी
कात्री गावातही पुराचे पाणी शिरल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. यवतमाळ शहरातील बांगरनगर, तलाव फैल, धोबी घाट, अंबिकानगर, पाटीपुरा, जिजाऊनगर आदी परिसरात पुराचे पाणी शिरले असून, प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. तर, कळंबसह राळेगाव, वणी आणि घाटंजी तालुक्यांतील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोडमोहा येथील नाल्याला पूर आल्याने ३० घरांमध्ये पाणी शिरले. येथील सुमारे १२ कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात समाजमंदिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव-सरई रस्ता, सरई-चिखली, दापोरी-कासार, नायगाव ते कळंब धनगाव रस्ता, तर कळंब तालुक्यातील खोरद-कळंब रस्ता, आर्णी तालुक्यातील गणगाव रस्ता आदी मार्गांवरील वाहतूक पुराच्या पाण्यामुळे ठप्प होती.