लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. या काळात हॉटेल व्यवसाय पूर्णत: बंद आहे. बाहेरगावी असलेले अनेक जण गावाकडे परतले आहे. संचारबंदीत बहुतांश व्यवसाय अडचणीत आले असताना पिठ गिरणी व्यवसायाला मात्र सुगीचे दिवस आले आहे.गत दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे बाहेरगावी जाण्याचा प्रश्नच उरला नाही. परिवारातील सर्वच सदस्य एकत्रितपणे घरातच बंदीस्त अहे. साहजिकच घरातील सदस्य संख्येत वाढ झाल्याने दररोज लागणाऱ्या वस्तूंचे प्रमाण वाढले आहे. जेवणात दररोज लागणारी भाकर आणि चपात्याही महिला वर्गाला अधिकच कराव्या लागत आहे. परिणामी अन्नधान्याच्या विक्रीत वाढ झाली आणि त्याचबरोबर पिठ गिरणी व्यवसायाला सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे.शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक आहे. शहरात पिठ गिरण्यांची संख्या पन्नासहून अधिक आहे. सरासरी या सर्व गिरण्यांमधून दररो ३00 क्विंटलपेक्षा अधिक धान्य दळून दिले जाते. त्याचप्रमाणे काही नागरिकांकडे घरच्या घरी व सिंगल फेजवर चालणाऱ्या पिठ गिरण्या आहे. काही नागरिक इन्स्टंट पिठाचा वापर करतात. एकूण गोळाबेरीज केली तर दररोज अंदाजे ५०० क्विंटल गहू व ज्वारी धान्य पुसदकरांना दररोज लागते. कोरोनाच्या प्रादुर्भावाने नागरिकांचे जीवनमान पूर्णपणे बदलले आहे. कोरोनाची भीती नागरिकांच्या मनामध्ये घर करुन बसलेली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या दररोजच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्येसुद्घा बदल घडवून आणले आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य जास्तीत जास्त सदृढ कसे राहील, याची पूरेपूर काळजी घेतली जात आहे.
किराणा जिन्नसाची मागणी वाढलीपुणे, मुंबई, औरंगाबाद, हैद्राबाद तसेच अन्य शहरातून आणि परराज्यातून गावी परत आलेल्या नागरिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे घरच्या बाहेर पडण्याची मुभा फार थोडी आहे. त्यामुळे दिवसभर घरातच राहावे लागते. परिणामी दररोजच्या जेवणाबरोबर इतर पदार्थ करुन आस्वाद घेणाऱ्या कुटुंबांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी सहजिकच किराणा आणि आवश्यक असलेल्या वस्तूंची मागणीही वाढली आहे. लॉकडाऊनपूर्वी एरव्ही पिठ गिरणीत फारशी गर्दी राहत नसे. आता मात्र दळणासाठी गर्दी होत असल्याचे एका पिठ गिरणी चालकाने सांगितले.