रूपेश उत्तरवार
यवतमाळ : खरे तर टाकाऊ वस्तू भंगारात फेकल्या जातात. मात्र, या वस्तूंचा निसर्गसौंदर्य वाढविण्यासाठी उपयोग होईल, असा कुणीच विचार करीत नाही. यवतमाळातील जगदीश शर्मा यांनी अशक्यप्राय टाकाऊ वस्तूंमध्ये निसर्ग सौंदर्य खुलविले आहे. इलेक्ट्रिक बटणपासून ते टूथपेस्ट आणि गेलेल्या बल्बमध्ये फुलझाडांना वाढविले आहे. त्यांच्या कलेतील हा आधुनिक उपक्रम यवतमाळकरांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. अशा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने निसर्गसौंदर्य खुलविण्याचा हा प्रयोग जागतिक रेकॉर्ड निर्माण करणारा आहे.
निसर्ग फुलविण्यासाठी आवड असेल तर मार्ग नक्की निघतो. मग अपुरी जागा आहे, याचा बहाणा शोधला जात नाही. यवतमाळातील इंद्रप्रस्थनगरीत वास्तव्याला असणारे जगदीश शर्मा हे ऑप्टिकल व्यावसायिक आहेत. त्यांनी नियमित वेळातून काही वेळ राखून ठेवला. यात टाकाऊ वस्तूंमध्ये वृक्षारोपण करून ते वाढविले आहे. यातून घराची परसबाग समृद्ध केली आहे. यासाठी त्यांनी छोट्या-मोठ्या १५० वस्तूंचा वापर केला आहे.
मोबाइल, चार्जर, मार्कर पेन, पिचकारी, शंख, सेल, कॅसेट, माऊस, टूथपेस्ट, घड्याळ, इलेक्ट्रिक बटण, टॉर्च, चाडी, गाडीचे इंडिकेटर, बूट, बल्ब, होल्डर, छोटा टायर, झाडणी, नारळ कटोरा, झाडूची दांडी, पेचकस अशा विविध वस्तूंमध्ये वृक्ष लावले. आणि हँगिंग गार्डन पद्धतीने त्याला लटकविले आहे. यामुळे घराच्या परसबागेचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
अशा छोट्या वस्तूंत वृक्ष लागतात आणि बहरतात, हे त्यांनी प्रयोगातून सिद्ध केले आहे. गत वर्षभरात या वृक्षांची वाढ झाली आहे. ते वृक्ष बहरले आहेत. याशिवाय मनीप्लँटसह मेंटरी, जलबेरा, स्पायडरमॅनसारख्या वृक्षांचा यासाठी वापर केला आहे. याशिवाय इतर दुर्मीळ वनस्पती आणि निसर्गाच्या सानिध्यातील काही झाडे त्यात लावण्यात आली आहेत.
५०० वृक्षसंगोपनातून वर्ल्ड रेकॉर्ड
आतापर्यंत दुर्मीळ १५० वस्तूंत वृक्षांची लागवड त्यांनी केली आहे. आता ५०० विविध निरुपयोगी आणि अशक्यप्राय गोष्टीत दुर्मीळ वृक्षसंवर्धन करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. यातून वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी शर्मा यांनी तयारी सुरू केली आहे. त्यांच्या गार्डनमध्ये नवे प्रयोग पाहायला मिळत आहेत.