व्ही. गिरीराज : बळीराजा चेतना अभियानासह विविध बाबींचा आढावायवतमाळ : शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास ती गावातच सोडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर याची व्याप्ती वाढविण्याचे आवाहन ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव व्ही. गिरीराज यांनी केले. महसूल भवन येथे पालक सचिवांनी बळीराजा चेतना अभियानासह धडक सिंचन विहीर, घरकुल, जीवनदायी आरोग्य योजना, आधारकार्ड, अन्न सुरक्षा योजना, सावकारी कर्जमाफी, जलयुक्त शिवार अभियान, विहिरींना विजजोडणी आदींचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, नरेंद्र फुलझेले, फडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मरसाळे, भुयार आदी उपस्थित होते. बळीराजा चेतना अभियानांतर्गत ग्रामस्तरावर जिल्हाभरात १८४८ समित्यांची स्थापना करण्यात आली. त्यातून अडचणी त्वरित सुटणार असल्याने नकारात्मक विचार डोक्याला शिवणार नाही. या समित्यांमुळे बळीराजाला जगण्याचे बळ मिळणार असल्याचे गिरीराज यांनी सांगितले. गावातील शेतकऱ्यांना गावातच सर्व प्रकारची सामाजिक, आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, असुरक्षिततेची भावना शेतकऱ्यांच्या मनालाही शिवणार नाही यासाठी गावस्तरावरील या समित्या काम करणार असल्याचे जिल्ह्याचे पालक सचिव व्ही. गिरीराज यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यावर भर द्या
By admin | Published: January 18, 2016 2:29 AM