लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भरदुपारी डोक्यावर पेटलेला सूर्य... खाली तापलेला डांबरी रस्ता.. जो-तो घरात दडलेला... तो मात्र बेवारस स्वत:ला शेकत बसलेला. पायात वाहाना नाही, डोईवर उपरणे नाही.. अन् ओठांवर शब्दही नाही! पायाला भळभळती जखम आहे. पोटात भूक आहे. ओठात तहान आहे. दुखरा पाय घेऊन गुपचूप जगत असलेला हा वृद्ध खरे तर हळूहळू मरत आहे... शेकडो वाटसरू रोज त्याच्याकडे पाहून पुढे जातात, कुणीतरी थांबावे, थोडेसे बोलावे अन् दुखºया पायाला बोचºया मनाला औषध मिळावे..!मंडळी, ही कहाणी एका माणसाची आहे. माणसाची यासाठी की त्याला नाव नाही, गाव नाही, जात नाही अन् पात नाही. घर नाही दार नाही अन् स्वत:शीही प्यार नाही. गेल्या १५ दिवसांपासून राधिका ले-आउट परिसरात त्याने मुक्काम ठोकला आहे. ले-आउटच्या पाटीशेजारीच तो बसलेला असतो. या परिसरातील अनेकांनी त्याची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. पण तो बोलत नाही. सिमकार्ड हरवलेल्या मोबाईलसारखा तो ‘म्यूट’ आहे. पागल वाटावा, असाच त्याचा वेश. पण तो ‘नॉर्मल’ आहे. जेवले का, असे विचारले तर नकारार्थी मान हलवतो. कुठे राहता, म्हटले तर जमिनीवर हात थोपटतो. अन् पैसे घ्या म्हटले तर हात पुढे करतो. पण कुठून आले, असे विचारताच तो निश्चल होतो.हातापायांवर धूळ साचून साचून आता मातीच्या खपल्या झाल्या आहेत. मातीच त्याची त्वचा बनली आहे. अंगाला घाण दर्प सुटलेला आहे. उजव्या पायाला भलीमोठी जखम झालेली आहे. मिळेल तो पालव त्याने त्या जखमेवर गुंडाळून ठेवलेला आहे. काही जणांच्या मते हा गँगरीनचा प्रकार आहे. या वृद्धाला तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज आहे. त्यापूर्वी त्याच्या पोटात दोन घास अन्न आणि पाणी जाण्याची गरज आहे. टळटळीत उन्हात तो रोज असाच राहिला तर आजाराच्याही आधी उष्माघाताने दगावण्याची भीती आहे.जख्ख म्हातारपण आलेल्या या माणसाकडे भान आहे. पण तो कुणाला काहीच सांगत नाही. तो कुठून आला, त्याचे नाव काय, त्याला नेमके काय झाले, तो राधिका ले-आउटमध्येच का थांबलेला आहे... असे अनेक प्रश्न या भागातील सहृदय नागरिक त्याला विचारतात, पण तो फक्त शून्यात नजर लावून बसतो. नागरिकांच्या मनाला मात्र चुटपूट लागते. बापाच्या वयाचा हा माणूस भरउन्हात जखम घेऊन बेवारस का बसतो, हे कुणालाच कळत नाही. कुणीतरी या निनावी माणसाला दवाखान्यात पोहोचविण्याची गरज आहे.हरलेल्या आत्म्यावर विजेत्याचे वस्त्रमाणसाचे आयुष्य विसंगतींनीच भरलेले आहे. हा अस्तित्वहीन वृद्ध काहीतरी उचलून खातो आणि जगतोय. त्याच्या ओळखीच्या कोणत्याच खाणाखुणा त्याच्याकडे नाही. समाजातल्या गर्दीत तो बसतो तरी तो एकटा आहे. हातपाय, नाक, डोळे आहे म्हणून त्याला माणूस म्हणायचे. अन्यथा तो हलता पुतळा बनलेला आहे. काहीही न बोलणाºया या वृद्धाच्या मनात भावना कुठे गडप झाल्या असतील? सर्वस्व हरवून बसलेल्या या माणसाच्या अंगावर कुणीतरी टी-शर्ट चढविले आहे. त्यावर लिहिलेले आहे ‘द ओन्ली थिंग दॅट आय अॅडिक्टेड इज विनिंग’! आता तो काय जिंकणार? समाजाचे प्रेम की स्वत:चे अस्तित्व?
दुखऱ्या पायाला, बोचऱ्या मनाला औषध मिळावे..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 10:07 PM
भरदुपारी डोक्यावर पेटलेला सूर्य... खाली तापलेला डांबरी रस्ता.. जो-तो घरात दडलेला... तो मात्र बेवारस स्वत:ला शेकत बसलेला. पायात वाहाना नाही, डोईवर उपरणे नाही..
ठळक मुद्देतातडीने उपचाराची गरज : १५ दिवसांपासून भरउन्हात विव्हळतोय वृद्ध