लोकमत न्यूज नेटवर्कअकोलाबाजार : शेतकरी आता बियाणे, खत व कीटकनाशके हेही ऑनलाइन बोलविण्याच्या तयारीत आहे. स्थानिक कृषी केंद्रांपेक्षा कमी दरात हे मिळत असल्याने ऑनलाइन खरेदीचा पर्याय वापरला. मात्र, वागदा येथे प्रतिबंधित बियाणे, रासायनिक खत व कीटकनाशक आल्याने त्यावर कृषी विभागाने कारवाई केली. तब्बल पावणेतीन लाखांचा मुद्देमाल गुरुवारी जप्त केला. वागदा परिसरातील शेतकऱ्यांनी पोर्टलवरून ऑनलाइन बियाणे, खत, कीटकनाशके बुक केले. नागपूर येथील एका गोडावूनमधून कुरिअरच्या माध्यमाने हा माल गुरुवारी सायंकाळी वागदा गावात पोहोचला. हे बियाणे शेतकऱ्यांच्या ताब्यात जाण्यापूर्वीच कृषी विभागाला याचा सुगावा लागला. सतर्क असलेले कृषी सहायक सचिन वाघमारे यांनी सदर मुद्देमाल घेऊन आलेल्या कुरिअरच्या दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले व याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पांडुरंग फाळके हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बियाणे व कीटकनाशक याचा परवाना आहे की नाही, याची शहानिशा केली. नंतर पंचनामा करून हे बियाणे वडगाव जंगल पोलीस ठाण्यात आणले. तेथे तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून कुरिअर गोडावून कीपर महेश विभीषण पाटील याच्याविरुद्ध कृषी कायद्यांतर्गत विविध कलमानुसार, तसेच भादंवि कलम ४२०, ४६५ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार पवन राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
कापूस व तुरीच्या १०३ बॅग- वागदा येथील शेतकऱ्याने ऑनलाईन बियाणे खरेदी करताना कापसाच्या १०० बॅग, तुरीच्या तीन बॅग, कीटकनाशकाचे २२ डबे तर रासायनिक खताच्या (पाच किलो) ७० बॅग बोलाविल्या होत्या. हा माल शेतकऱ्याच्या हाती लागण्यापूर्वी कुरिअर बॉयजवळून कृषी विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला.
ऑनलाइन बियाणे खरेदी पहिल्यांदाच उघड - शेतकऱ्यांकडून ऑनलाइन खत, कीटकनाशक बियाणे खरेदी केले जात असल्याचा प्रकार पहिल्यांदाच उघड झाला आहे. या ऑनलाइन बियाणे खरेदीत विश्वासार्हता काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून फसविण्याचा प्रकार सुरू असतो. प्रतिबंधित बीटी बियाण्यांचाही असाच प्रचार, प्रसार करून बोगस बियाणे माथी मारले जाते, नंतर पश्चात्तापाची वेळ येते.