कळमुलातील किमया : अल्पभूधारक शेतकरी युवकांची झेप, बिकट परिस्थितीतही मिळाली उभारीदिनेश चौतमाल मुळावाशेतीला उद्योगधंद्याची जोड असल्याशिवाय शेतकरी प्रगतिपथावर जावू शकत नाही, असं कृषी तज्ज्ञांचं मत आहे. किंबहुना सध्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट आहे की, उद्योगधंद्याची सांगड घातल्याशिवाय उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. उद्योग म्हटला की भांडवल उभारण्याचा प्रश्न निर्माण होतो. या सर्व परिस्थितीवर मात करत कळमुला येथील अल्पभूधारक शेतकरी युवकांनी सामूहिक दुग्ध व्यवसाय सुरू केला. यातून त्यांना यशाचा मार्ग गवसला. या समूहाकडे एकूण नऊ म्हशी आहे. दररोज ४० ते ५० लिटर दूध विक्री होते. दरमहा ६० हजार रुपयांचे उत्पादन होते. बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने अनंतराव दत्तराव कनवाळे, सतीश आबाराव कनवाळे, अनंता दत्तराव जाधव, संतोष वसंतराव कनवाळे या युवकांनी सामूहिक दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरविले. सुरुवातीला एक लाख ७० हजार रुपयातून गोठा तयार केला. पुढे चौघांनी मिळून सुमारे तीन लाख ५० हजार रुपयांच्या म्हशी विकत घेतल्या. वाळलेला चारा, सोयाबीनचे कुटार, कडबा, एक एकरात गजराज गवत, अर्धा एकरात ऊस, एक एकरात ज्वारी असे चाऱ्याचे नियोजन केले. आज दररोज ५० लिटर दुधाचे उत्पादन ते घेत आहे. सुरुवातीच्या चार म्हशी आणि या म्हशींच्या दुधातून आलेल्या रकमेतून पुन्हा पाच म्हशी घेतल्या. आता त्यांच्याकडे नऊ म्हशी आहेत. मुळावा येथील एका खासगी दूध संकलन केंद्रावर ते दुधाची विक्री करतात. दूध उत्पादनातून दरमहा ६७ हजार ५०० रुपये मिळू शकतात, असे त्यांनी सांगितले. सततच्या नापिकीने मेटाकुटीस आलेला शेतकऱ्यांनीही या व्यवसायाची कास धरावी, असा संदेश या युवकांचा आहे. कर्जाशिवाय उभारला व्यवसायकुठल्याही बँकेचे कर्ज अथवा शासनाचे अनुदान न घेता सदर युवकांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेत स्वतंत्र उद्योग सुरू करत रोजगार शोधला. म्हशीची देखभालही स्वत: करतात. या युवकांनी शोधलेला हा मार्ग अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. कुठल्याही कामाचा ध्यास घेतला तर ते कार्य सिद्धीला जाते, हेच या युवकांनी सिद्ध करून दाखविले आहे. विविध अडचणींचा सामना करत त्यांनी या व्यवसायात साधलेली प्रगती उल्लेखनीय अशी आहे. व्यवसाय प्रगतिपथावर नेण्यासाठी त्यांची जिद्द कौतुकास्पद आहे.
युवकांच्या एकीतून दुग्ध व्यवसायाला बळ
By admin | Published: November 20, 2015 3:01 AM