लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एनपीएस पेन्शन योजना घेण्यासाठी प्रशासनाकडून जबरदस्ती केली जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी शुक्रवारी यवतमाळ पंचायत समितीत धडक देऊन आंदोलन केले.सन २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. त्याऐवजी त्यांना नवीन अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) देण्यात आली आहे. मात्र आता डीसीपीएसचेही एनपीएसमध्ये (राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना) हस्तांतरण केले जात आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून सीएसआरएफ अर्ज भरून घेतले जात आहेत. मात्र त्यासाठी शिक्षक तयार नाहीत. आधी या योजनेचे फायदे-तोटे समजावून सांगा, नंतरच आम्ही फाॅर्म भरून देऊ, अशी भूमिका शिक्षकांनी घेतली. त्यासाठी अर्जही केले. परंतु, प्रशासनाने फाॅर्म भरून न दिल्यास वेतनाला विलंब होईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी शुक्रवारी पंचायत समितीत आंदोलन केले. गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनाही भेटून प्रश्न मांडण्यात आला. यावेळी नदिम पटेल, मिलिंद सोळंके, सुरेंद्र दाभाडकर, प्रवीण बहादे, प्रफुल्ल पुंडकर, विलास राठोड, सैयाद काझी, मीनाक्षी लोखंडे, नंदनवार, अक्षय मिठे, दिनेश डहाके, यशपाल मेश्राम उपस्थित होते.