आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान विषबाधा होऊन शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. आता आलेल्या फॉरेन्सिक अहवालात मृतांच्या शरीरात विषाचा अंशच सापडला नसल्याचे पुढे आले आहे. पण विषबाधेसाठी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे अंश सापडल्याचे म्हटले आहे. यावरून शासकीय यंत्रणेने हा फॉनेन्सिक अहवालच मॅनेज केल्याचे दिसते, असा आरोप विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केला.सोमवारी यवतमाळात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मृतांच्या व्हिसेरात विष आढळले नाही, मात्र विषबाधेवर दिलेले औषध आढळले. मग डॉक्टरांनी केलेला विषबाधेचा उपचार चुकीचा समजावा काय? तसे असेल तर डॉक्टरांवर सरकार कारवाई का करीत नाही? या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकार बनवाबनवी करीत आहे. हे सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील नाही. बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. काँग्रेस सरकारने अशा प्रत्येक संकटात शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली. आताचे भाजपा सरकार मात्र तांत्रिक निकष लावून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवत आहे.बीटीवर फवारणीची वेळ येणार नाही असा दावा असताना मारेगाव, नेर, दारव्हा परिसरात प्रचंड बोंडअळी आलेली आहे. या नुकसानीचा तत्काळ सर्वे केला पाहिजे. अर्ज भरून न घेता सरसकट मदत दिली पाहिजे. ज्या कंपन्यांनी बीटी बियाण्यांचा काळाबाजार केला, त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे नोंदवावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. कापूस, सोयाबीनचे अत्यल्प उत्पादन येत आहे. पण राज्यशासनाने खरेदीच सुरू केली नाही. शासकीय खरेदी केंद्र वाढविण्याची गरज आहे. शिवाय कापसाला ७ आणि सोयाबीनला ५ हजार रुपये भावाप्रमाणे तातडीने शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणीही त्यांनी केली.काँग्रेस अधिवेशनावर नेणार शेतकरी दिंडीविधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, शेतकरी, कर्मचारी, व्यापारी असे सर्व घटक भाजपा सरकारवर चिडलेले आहे. इतका गोंधळाचा कारभार राज्यात मी यापूर्वी कधीही पाहिलेला नाही. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांची दिंडी नेण्यात येणार आहे. त्यासाठीच मंगळवारी मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक होत असून त्यात मोर्चाबाबत अंतिम निर्णय होईल. मराठवाडा, खान्देश, विदर्भासह संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या दिंड्या गावागावातून नागपुरात धडकतील. त्यानंतर या दिंड्या एकत्र येऊन विधानसभेवर शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा धडक देईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी दिली.
यवतमाळच्या फवारणी विषबाधा प्रकरणातला फॉरेन्सिक अहवाल मॅनेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 2:04 PM
शासकीय यंत्रणेने यवतमाळच्या फवारणी विषबाधा प्रकरणातला फॉरेन्सिक अहवाल मॅनेज केल्याचे दिसते, असा आरोप विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केला.
ठळक मुद्देमाणिकराव ठाकरे यांचा आरोपशासनाने शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी