यवतमाळ : दऱ्याखोऱ्या, जलाशय आणि जंगलांनी समृद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात विविध प्रकारच्या देखण्या पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती आहेत. हे विखुरलेले पक्षीवैभव आता अभ्यासकांना एकाच ठिकाणी पाहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. वन विभागाने जिल्ह्यातील सर्व पक्षीप्रजातींची माहिती त्यांच्या आकर्षक छायाचित्रांसह पुस्तकरुपात संकलित केली आहे.
येथील अमोलकचंद महाविद्यालयातील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. प्रवीण जोशी यांच्या सहकार्याने वन विभागाने ही माहिती स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून संकलित केली. त्यासाठी डॉ. जोशी यांनी गेली दोन-तीन वर्षे जिल्हा पालथा घातला. जंगले आणि विविध ठिकाणची जलाशये गाठून जोशी यांनी पक्ष्यांची माहिती संकलित करण्यासह त्यांची छायाचित्रे घेतली. त्यातून ‘यवतमाळचे पक्षीवैभव’ हे माहितीपर पुस्तक तयार झाले. २६ जानेवारी रोजी पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्याहस्ते बचत भवन येथे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सीईओ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, यवतमाळचे उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहायक वनसंरक्षक दिगोळे व पुस्तकाचे लेखक डॉ. प्रवीण जोशी उपस्थित होते. या पुस्तकामुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील पक्षी अभ्यासकांसाठी माहितीचा खजिना उपलब्ध झाला आहे.
या पुस्तकात यवतमाळसह सहा तालुक्यांतील जलाशये, माळरान, झुडपी जंगले अशा अधिवासात आढळणाऱ्या स्थलांतरित व स्थानिक ३२३ पक्ष्यांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासोबतच पक्षी आढळणाऱ्या ठिकाणांचा नकाशा देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व पक्षांची शास्त्रीय सूची देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे मत पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी व्यक्त केले.