भास्कर देवकतेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभागाअंतर्गत टिपेश्वर अभयारण्यातील टी१सी१ या नर वाघाने औरंगाबाद- बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेवरील ज्ञानगंगा अभयारण्यात आपले बस्तान मांडले आहे. आता तिथे त्याला स्थिरावण्यासाठी जोडीदाराचा शोध वनविभाग घेत आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात स्थायिक होण्यापूर्वी या वाघाने तब्बल तीन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. त्याच्या या प्रवासात टिपेश्वर ते तेलंगणाजवळील आदिलाबादच्या जंगलापर्यंत तसेच उमरखेडचे पैनगंगा अभयारण्य ते औरंगाबादमधील ज्ञानगंगा आणि अजिंठा डोंगरापर्यंतचा प्रवास समाविष्ट आहे.टिपेश्वरच्या आसपास या वाघाने ३६० किलोमीटर, टिपेश्वार ते ज्ञानगंगा १,४७५ किलोमीटर आणि ज्ञानगंगाच्या आसपास १,१५५ किलोमीटरचे अंतर कापल्याने वनाधिकाऱ्यांनी त्याचे वॉकर असे नामकरण केले आहे. वनाधिकाऱ्यांनी त्याला पकडले तेव्हा त्याच्या पोटाजवळ वायरचे जाळे होते. एक महिन्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि तो व्यवस्थित चालायला लागला. २१ जून २०१९ पर्यंत तो टिपेश्वर, आदिलाबाद आणि पैनगंगा येथे फिरत होता. तदपत्चात पाच डिसेंबरला ज्ञानगंगामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याठिकाणी तो बराचवेळ होता. आता तो त्याठिकाणीच स्थायिक झाला असून या अभयारण्यातील गाभा क्षेत्रातील ५२ चौरस किलोमीटरचे क्षेत्र त्याने व्यापले आहे.भारतीय वन्यजीव संस्थानचे वैज्ञानिक डॉ. बिलाल हबीब आणि त्यांच्या चमुने सुमारे सहा हजार वेगवेगळ्या ठिकाणचे त्याचे जीपीएस ठिकाण शोधले आहे. या दोन वर्षाच्या त्याच्या प्रवासात कधीही मानव आणि त्याचा संघर्ष घडून आला नाही. जंगलासह महामार्ग, नद्या, शेती अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याचा प्रवास झाला आहे. तो त्याचे नैसर्गिक खाद्य वापरत आहे. कधीही त्याने माणसांवर हल्ला केला नाही. त्याची ही संपूर्ण वाटचाल जोडीदाराच्या शोधात असल्याचे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ज्ञानगंगातील त्याचा मुक्काम पाहता त्याच्यासाठी जोडीदार त्याठिकाणी सोडावा का? यावर निर्णय घेण्याकरिता वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी तज्ज्ञांची समिती नेमली आहे.