यवतमाळ : सहा दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखा व वन विभागाच्या फिरत्या पथकाने संयुक्त कारवाई करून जवळपास एक क्विंटल चंदनाचे लाकूड जप्त केले. बनावट गिऱ्हाईक पाठवून ही तस्करी उघड करण्यात आली. यावेळी एकच आरोपी पथकाच्या हाती लागला. त्याच्याकडून चंदन जप्त करण्यात आले. नंतर या प्रकरणाचा तपास वन विभागाच्या फिरत्या पथकाने सुरू ठेवला. त्यात चंदनतोड ही पाथ्रड धरण परिसरात केली असल्याचे उघड झाले.
फिरत्या पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. ओंकार रामराव व्यवहारे, सूरज बळीराम नागमोते, दोघेही रा. मुरझडी, असे त्यांचे नाव आहे. त्यांचा साथीदार दशरथ सूर्यभान नागमोते याला १० जानेवारीला अटक केली होती. त्याच्याकडून चंदनाचे ९५ किलो लाकूड जप्त केले. मात्र, त्याची प्रकृती बिघडल्याने वनकोठडी मिळविता आली नाही. आरोपीला रुग्णालयात भरती करावे लागले. नंतर त्याची कारागृहात रवानगी झाली. अशाही स्थितीत वनपथकाने तपास सुरू ठेवत इतर आरोपींचा माग काढला. त्यात गुन्ह्यात वापरलेल्या कारसह दोघांना अटक करण्यात आली.
या आरोपींनी हे चंदन दारव्हा तालुक्यातील पाथ्रड देवी नर्सरी परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरून वनपथकाने घटनास्थळाची पाहणी केली. यातील आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे. मोठे रॅकेट असून, यातील बडे मासे शोधण्याचा प्रयत्न वन विभागाचे पथक करीत आहे. अनेक वर्षांनंतर जिल्ह्यातील चंदन तस्करी सुरू असल्याचे पुढे आले आहे. यामुळे वन विभागाची यंत्रणा या तस्कारांची पाळेमुळे खोदण्याच्या प्रयत्नांत आहेत. प्रत्येक बारीक हालचालीवर लक्ष ठेवून या टोळीतील सदस्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.