यवतमाळ : यवतमाळ शहरासह जिल्हय़ात भाजपाचे एकमेव नेते आहे. या नेत्याने सलग दोनदा विधानसभेत पराभव पत्करला आहे. आता त्याच नेत्याकडून शहरात भाजप नगरसेवकांमधून दुही संपुष्टात आणण्यासाठी हालचाली केल्या जात आहे. हे करताना भाजप जिल्हाध्यक्षासह पक्षातील अनुभवी आणि जाणत्या नेत्यांना पद्धतशीरपणे डावलण्यात येत आहे. राजकारणात सर्व काही चालून जाते. याचा परिचय भाजपातील हालचालीवरून दिसून येत आहे. या माजी नेत्याचा कट्टर सर्मथक तत्कालीन जिल्हाध्यक्षाच्या विरोधात होता. इतकेच काय तर अगदी अर्वाच्च भाषेत सार्वजनिकरीत्या त्याने पाणउतारा केला होता. याच माजी जिल्हाध्यक्षामुळे नगराध्यक्षपदी अनपेक्षितपणे वर्णी लागलेल्या नगरसेवकांना आता त्यांच्या विरोधात खासगी व्यवहारासंदर्भात खटला दाखल केला आहे. नगरपरिषदेत भाजपचे १६ नगरसेवक असून त्यामध्ये तीन ते चार गट आहेत. विशेष म्हणजे या माजी आमदार असलेल्या नेत्याकडूनच या गटबाजीला खतपाणी घालण्यात आले होते. राष्ट्रवादीला हाताशी धरून हा कुरघोडीचा खेळ त्यांनी खेळला. आता विधानसभेचे वेध लागल्याने पुन्हा ‘या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे अपुल्या’ असा राग आळवत काल भाजपा जिल्हा कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला नगराध्यक्षासह नऊ नगरसेवक उपस्थित होते. एरवी एकमेकाची जिरविण्यासाठी थेट उच्च न्यायालयात जाऊन भांडणारे एकाच बैठकीत मंथन करतानाचे चित्र पहावयास मिळाले. ही बैठक इतक्यावरच थांबली नाही तर, माजी आमदार नेत्याने कधी नव्हे तो आपला खिसा सैल करून एका जिल्हा उपाध्यक्षाला त्याच्या घरी विशेष मेजवाणी आयोजित करण्यास सांगितली. संदीप टॉकीज परिसरात झालेल्या या मेजवाणीत माजी जिल्हाध्यक्ष आणि दोन उपाध्यक्ष यांच्यासह १0 नगरसेवक उपस्थित होते. आपल्या विरोधातील अपात्रतेचा खटला मागे घ्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. विशेष म्हणजे नगरसेवकांच्या अपात्रते संदर्भात ११ जून रोजी जिल्हाधिकार्यांकडे सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी ही बैठक झाल्याने नेमकी काय व्यूहरचना आखली जाते, याकडे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीत जबर मार खाल्ल्यानंतरही पुन्हा एकदा मोदी लाटेत आपले कार्ड चालविण्याचा प्रयत्न या माजी नेत्याकडून केला जात आहे. श्रेष्ठींच्या नजरेत पक्षावर आज माझीच पकड आहे, हे दाखविण्यासाठी धडपड सुरू असल्याचेही भाजपच्याच गोटातून बोलले जात आहे. एरवी कार्यकर्त्यांशी अतिशय फटकून वागणार्या माजी नेत्याने आता मवाळ भूमिका घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. विधानसभेसाठी काही झाले तरी भाजपने या नेत्याला उमेदवारी देऊ नये, अशी मागणी निष्ठावंतांकडून जाहीररीत्या केली जात आहे.समेटाची बैठक आयोजित करण्यासाठी स्वत:ला विधानसभेचा उमेदवार म्हणविणार्याच जिल्हा सरचिटणीसने कष्ट घेतले. त्यांची निष्ठा कशावर भाळते, हे माजी नेत्याला चांगले ठाऊक असल्याने त्यांच्याकडून परिस्थिती अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)
भाजपच्या माजी आमदारांचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न
By admin | Published: June 09, 2014 11:51 PM