- संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) : अज्ञात समाजकंटकांनी अंगणात उभ्या असलेल्या बोलेरो जीपचा काच फोडून त्यात ज्वलनशील पदार्थ टाकला व वाहन पेटवून दिले. रविवारी पहाटे २:३० वाजताच्या सुमारास येथील प्रगतीनगरमध्ये घडलेल्या या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. येथील माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते राजू तुराणकर यांचे ते वाहन होते.
शनिवारी राजू तुराणकर हे काही खासगी कामासाठी यवतमाळ येथे गेले होते. रात्री परत आल्यानंतर त्यांनी त्यांची बोलेरो (एमएच ३१-सीएस ७९००) अंगणात उभी ठेवली. रविवारी पहाटे २:३० च्या सुमारास बोलेरो वाहनातून धूर निघत असताना दिसून आले. शेजाऱ्यांनी लगेच याबाबत राजू तुराणकर यांना माहिती दिली. तोपर्यंत गाडीने आतून चांगलाच पेट घेतला होता. पाणी टाकून ही आग आटोक्यात आणण्यात आली.
या आगीत वाहनाचे मोठे नुकसान झाले. कुण्यातरी अज्ञात समाजकंटकांनी हे कृत्य केले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. ज्या दगडाने वाहनाचा काच फोडण्यात आला, तो दगडही वाहनाच्या बाजूने पडून होता. यासंदर्भात राजू तुराणकर यांनी वणी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे.