अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अखिल महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिकांची नजर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे वळली आहे. त्याचा प्रत्यय शनिवारी आला. ९१ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी बोथबोडन या खेड्यात पोहोचून आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत दिली. शिवाय, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या कुटुंबाला मदत मिळवून देण्याची मागणीही केली.यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन गावात उल्हास तेजा राठोड या शेतकऱ्याने कर्जापायी आत्महत्या केली. या कुटुंबाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी लक्ष्मीकांत देशमुख यांनी शनिवारी संमेलनस्थळ सोडून बोथबोडन गाठले. मंडळ अधिकारी अविनाश वानखडे, अनुप चव्हाण आदी त्यांच्यासोबत होते. यावेळी राठोड यांची पत्नी, आई यांच्याशी संवाद साधण्यात आला. पोरांना खाऊ आणि ११ हजार रुपयांची मदतही देण्यात आली. मात्र या कुटुंबाला अद्यापही शासकीय मदतीचा चेक मिळाला नसल्याचे कळले. तेव्हा लक्ष्मीकांत देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी फोनवर संपर्क केला. तसेच नंतर त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शासकीय मदत राठोड कुटुंबीयाला मिळवून देण्याची विनंती केली.
पूर्व संमेलनाध्यक्षांची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 9:50 PM