वरुडचा थरार : दहा मिनिटे दिला ठिय्याअशोक पिंपरे राळेगाव स्थळ : वरुड रस्त्यावरील जंगल. वेळ रात्री ८ वाजताची. पट्टेदार वाघ अचानक वाहनापुढे उभा. चालकाने प्रसंगावधान राखून वाहनाच्या काचा वर चढविल्या. धिप्पाड वाघ दोनदा वाहनावर चढला. दहा मिनिटे ठिय्या देऊन जंगलात मार्गस्थ झाला. हा थरार मंगळवारी रात्री विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके यांनी अनुभवला. यामुळे या परिसरात पट्टेदार वाघाचा संचार असण्यावरही शिक्कामोर्तब झाले. प्रा. वसंतराव पुरके मोहदा येथून मंगळवारी रात्री राळेगावकडे येत होते. वरुडलगतच्या जंगलातून रस्त्यावर अचानक पट्टेदार वाघ आला. धिप्पाड वाघ पाहून वाहन चालकाची पाचावरण धारण बसली. मात्र प्रसंगावधान राखून त्याने वाहन थांबवित तत्काळ काचा वर केल्या. वाहनात प्रा. पुरके आणि त्यांचे पाच कार्यकर्ते होते. एक-दोन मिनिटात वाघ निघून जाईल, असा त्यांचा अंदाज होता. मात्र या वाघाने तब्बल दहा मिनिट तेथेच तळ ठोकला. दोनदा वाहनावर चढला. एकदा तर प्रा.पुरके बसलेल्या खिडकीजवळ जाऊन काचेतून पाहू लागला. हा घटनाक्रम सुरू असतानाच प्रा. पुरके यांनी वन विभागाशी संपर्क साधला. या भागात वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडत आहे. दोघांना जीव गमवावा लागला. आज माझ्या वाहनापुढे वाघ आला. आपणही वाघाचे भक्ष झालो असतो. त्यामुळे वाघ पकडण्याची मोहीम अधिक तीव्र करा, अशी सूचना दिली. दरम्यान काही वेळाने हा वाघ रस्त्याच्या कडेने चालत जंगलात लुप्त झाला. या भागात पट्टेदार वाघ असल्याचे परिसरातील नागरिक सांगत होते. अनेकांनी याची धास्तीही घेतली आहे. दुचाकीने तर जाणेच बंद झाले आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे. विलक्षण योगायोग प्रा.वसंतराव पुरके खैरगाव कासार येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात असताना वरुड जवळ त्याच पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. हा विलक्षण योगायोग पुरके यांना अनुभवावा लागला.
माजी आमदारांच्या वाहनावर चढला वाघ
By admin | Published: September 22, 2016 1:27 AM