लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या यवतमाळ जिल्हा परिषदेत विधानसभेच्या धर्तीवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. केवळ सत्तेचा अर्थात पदे वाटपाचा फॉर्म्युला तेवढा ठरणे बाकी आहे. त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीनही पक्षाच्या प्रमुख नेते, पदाधिकारी व सदस्यांची महत्वपूर्ण बैठक ११ जानेवारी रोजी यवतमाळात होत आहे.जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले जाणार हे स्पष्ट आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणार आहे. पक्षाने तसे धोरणच ठरविले आहे. तीनही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीसुद्धा त्यासाठी पूर्णत: अनुकूलता दर्शविली आहे. जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या सत्तेचा फॉर्म्युला नेमका कसा असेल याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.त्यानुसार, २० सदस्यीय शिवसेनेने जिल्हा परिषद अध्यक्ष पदासोबतच दोन सभापती पदांवर दावा सांगितला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. अपक्षासह १२ जागा काँग्रेसकडे आहेत. मात्र अधिक जागा असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपद दिले जाऊ शकते. या माध्यमातून बंगल्याला खूश करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. मात्र राष्ट्रवादीला सभापती पद देण्याची तयारी नाही. काँग्रेसला दोन सभापती पदे दिली जाऊ शकतात. एका सभापतीपदासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. एखादवेळी महाविकास आघाडीत दुसऱ्या क्रमांकाच्या जागा आहेत, असे सांगून काँग्रेसकडूनही उपाध्यक्ष पदासाठी आग्रह धरला जाऊ शकतो.कोणत्या पक्षाला कोणती पदे याबाबतच अद्याप निर्णय झालेला नसला तरी तीनही पक्षात संभाव्य दावेदारांची नावे चर्चिली जात आहे. शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी डॉ. रुख्मिणी उकंडे आणि कालिंदा पवार यांची नावे चर्चेत आहे. मतदारसंघात सत्तेचे दुसरे केंद्र तयार होऊ नये म्हणून सेनेत एखादवेळी उकंडे यांच्या नावाला अधिक पसंती दर्शविली जाण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे.उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यास या पदावर पुसद विभागातील चेहरा असेल हे निश्चित. या पदासाठी ‘क्रांती’कारक निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेसकडून सभापती पदासाठी स्वाती येंडे, सुचरिता पाटील, वैशाली राठोड, जया पोटे, राम देवसरकर यांची नावे आघाडीवर आहे.शिवसेनेचा दोन सभापती पदांवर दावा आहे. त्यात ज्येष्ठ सदस्य गजानन बेजंकीवार व श्रीधर मोहोड यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेचा जोर बांधकाम आणि शिक्षण किंवा समाज कल्याण या दोन खात्यांवर अधिक आहे. याशिवाय सर्वच पक्षात इतरही सदस्य आपल्या परीने प्रयत्न करीत आहे.विजय राठोड यांची पुन्हा संधी हुकणारशिवसेना नेते, वनमंत्री संजय राठोड यांचे बंधू विजय राठोड जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांना उपाध्यक्ष बनविले जाईल, अशी चर्चा होती. गेल्या वेळी ही संधी हुकली. किमान आता तरी ही संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु यावेळीसुद्धा उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाण्याची चिन्हे असल्याने विजय राठोड यांची संधी हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सेनेकडून सभापती पदावर अन्य ज्येष्ठांना ‘अॅडजेस्ट’ केले जाणार असल्याने तेथेही संधीची शक्यता नसल्याचे सांगण्यात येते.
जिल्हा परिषदेसाठी ‘फॉर्म्यूला’ ठरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 6:00 AM
जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले जाणार हे स्पष्ट आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणार आहे. पक्षाने तसे धोरणच ठरविले आहे. तीनही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीसुद्धा त्यासाठी पूर्णत: अनुकूलता दर्शविली आहे. जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या सत्तेचा फॉर्म्युला नेमका कसा असेल याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देशनिवारी बैठक : अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड