यवतमाळ : दिवाळी म्हणजे सर्जनाचा उत्सव. अन् बालकांचे मन म्हणजे कल्पकतेचा झरा. या दोन्हींचा मेळ घालून यवतमाळ जिल्ह्यातल्या शाळांमध्ये छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले साकारण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी घरातील उरलेले सिमेंट, विटा, जुने पोते, रेती, रंग, जाड पुठ्ठे यांचा वापर करत आपल्या शाळांमध्ये हे गडकिल्ले उभारले आहेत. तर शिक्षण विभागाची यंत्रणा आता प्रत्यक्ष शाळा भेटी करत या किल्ल्यांची पाहणी करीत आहे.
ही पाहणी करताना एका शाळेत गेले की, शिवनेरी पाहायला मिळतो, दुसऱ्या शाळेत जाताच प्रतापगड पाहायला मिळतो अन् तिसऱ्या शाळेत ही यंत्रणा पोहोचली की रायगडाचे दर्शन घडते. सिंधुदुर्ग, राजगड अशा शिवरायांच्या गडांचे हुबेहुब प्रतिचित्र विद्यार्थ्यांनी साकारले आहे. दिवाळीचे औचित्य साधून नेरचे गटविकास अधिकारी राजीव शिंदे, गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमांचे शाळांमध्ये आयोजन करण्यात आले.
‘दिवाळी सर्वांची’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील बनवणे, शुभेच्छा कार्ड बनविणे, दिवा सजावट, तोरण तयार करणे, मान्यवरांना शुभेच्छा संदेश पाठवणे, आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शिवकालीन इतिहासाला उजाळा देण्यासाठी शिववैभव किल्ला निर्मिती स्पर्धा घेतली. यात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी कमाल करून दाखविली आहे. या उपक्रमासाठी शिक्षणविस्तार अधिकारी मीनेश काकडे, गट समन्वयक विजय धुरट, सर्व बीआरसी प्रतिनिधी, समावेशित तज्ज्ञ, आयईडी तज्ज्ञ यांचे सहकार्य लाभले.
गडाला दिले गावाचे नाव अन् शिवरायांचा राज्याभिषेकही !
चिमुकल्यांच्या कल्पकतेला महत्त्वाकांक्षेची जोड मिळाल्याचा नमुना दहिफळ गावात पाहायला मिळाला. दहिफळ गावातील जिल्हा परिषद शाळेतही विद्यार्थ्यांनी किल्ला तयार केला. मुख्याध्यापक गजानन हागे पाटील, बालाजी मुद्दमवार, सुशील राठोड, किशोर मुंडे यांच्या मार्गदर्शनात पाच दिवसांच्या मेहनतीने हा किल्ला साकारला. ८ नोव्हेंबरला या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करत विधिवत राज्याभिषेक सोहळा करण्यात आला. बीईओ मंगेश देशपांडे, पोषण आहार अधीक्षक वंदना नाईक, केंद्रप्रमुख बेले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामराव राठोड आदी उपस्थित होते.
शिववैभव किल्लानिर्मिती स्पर्धेत सहभागी शाळांनी प्राथमिक व उच्च प्राथमिक गटांत विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. या माध्यमातून नवीन पिढीसमोर शिवकालीन इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. सदर किल्ल्यांचे परीक्षण प्रत्यक्षात करण्यात आले. विजेत्या शाळांना समारंभपूर्वक लवकरच बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
- मंगेश देशपांडे, गटशिक्षणाधिकारी, नेर