महागाव : जिल्ह्यातील तब्बल साडेचार लाख शेतकरी अद्याप पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. त्यांना तातडीने विम्याचा लाभ द्यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा येथील विदर्भ जनआंदोलन संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यामध्ये केवळ दिग्रस व दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांना पात्र ठरवून पीक विम्याचा लाभ देण्यात आला. उर्वरित शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याचा लाभ द्यावा अन्यथा विदर्भ जनआंदोलन संघर्ष समितीच्यावतीने १ जूनला आंदोलन छेडण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन दिला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपन्यांची तत्काळ बैठक बोलावणार असल्याचे सांगितले. त्यांच्या आश्वासनामुळे जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. यातून विमा कंपन्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. त्या तुलनेत शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. विशिष्ट तालुक्याला कंपन्यांनी लाभ दिला. यामुळे जिल्ह्यातील वंचित शेतकरी संतप्त झाले आहेत.