वणी (यवतमाळ) : उकणी कोळसा खाणीत विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मृत वाघाचे सुळे दात व नखे घटनास्थळावरून लंपास करण्यात आली होती. याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून गुरुवारी रात्री चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून चार दात आणि काही नखे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत.
अंदाजे तीन ते चार वर्षे वय असलेल्या या वाघाच्या मृत्यूची घटना उघडकीस येण्यास १२ ते १३ दिवस लागले. ज्या ठिकाणी वाघाचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी बोअरवेल होती. या बोअरवेलच्या डीपीचा करंट लागून त्या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. वाघाचे दात आणि नखे गायब असल्यामुळे ते पळविले कुणी, याचा तपास वनअधिकाऱ्यांनी सुरू केला होता.
दोघांना वनकोठडी, तर दोघांना जामीन या प्रकरणातील आकाश धानोरकर व सतीश मांढरे या दोघांना न्यायालयाने जामीन दिला, तर नागेश हिरादेवे व रोशन देरकर या दोघांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे. वाघाचे अवयव पळविण्याच्या घटनेचा उलगडा झाला असला तरी वाघाच्या मृत्यूची जबाबदारी वनविभागाने अद्याप कुणावर निश्चित केलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.