पुसद : तालुक्यातील पार्डी येथे चार घरांना अचानक आग लागली. चारही घरे आगीत बेचिराख झाली. या आगीत सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
तालुक्यातील पार्डी येथे गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत चार घरे पूर्णतः जळून खाक झाली. अनसूयाबाई पुंजाजी धानोरकर, कुसुमबाई बंडू धानोरकर, रत्नमालाबाई प्रमोद धानोरकर आणि अब्दुल शेख इब्राहीम यांच्या घरातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागल्याचे कळताच गावकऱ्यांनी आपापल्या परीने आग विझविण्यासाठी धाव घेतली. पुसद नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत चारही घरांतील सर्व साहित्य खाक झाले होते.
या आगीत चारही घरांमधील टीव्ही, कपाट, फ्रीज, धान्य, कपडे आदी साहित्य भस्मसात झाले. त्यामुळे चारही कुटुंबे उघड्यावर आली. रत्नमालाबाई धानोरकर यांच्या घरात एक लाख रुपये, तर उर्वरित घरांतील २५ हजार, ४० हजार, ५० हजार अशी जवळपास दोन ते सव्वा दोन लाखांची रोकड या आगीत जळाल्याची माहिती ग्रामसेवक ए.बी. जाधव यांनी दिली. आगीची माहिती मिळताच वसंतनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तहसील कार्यालयाच्या वतीने मंडळ अधिकारी एन.आर. वाहुळे, ग्रामसेवक ए.बी. जाधव, तलाठी अमोल राठोड आदींनी पंचनामा केला. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.