यवतमाळ : संशयास्पद स्थितीत फिरताना एक टोळके पोलीस पथकाच्या निदर्शनास आले. या वेळी या टोळक्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस दिसताच त्यांनी पळ काढला. सिनेस्टाईल पाठलाग करून या टोळक्याला पोलिसांनी पकडले. दुचाकीच्या झडतीत विदेशी बनावटीची साधम्र्य असलेला नाईन एमएम देशी कट्टा, चार जिवंत काडतूस आणि लोखंडी रॉड जप्त करण्यात आला. तसेच त्यांना अटकही करण्यात आली. ही कारवाई येथील बसस्थानकात शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास करण्यात आली. प्रवीण ऊर्फ पिंटू काळे (२३), राहुल गणपत वाकडे (२४), अमोल शिवाजी धुमाळे (१९), अरविंद गणपत काकडे (२२), आकाश अशोक पारधी (२0), रुपेश श्रीराम बहिरम (२३) सर्व रा. भाग्यनगर, डोर्ली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ३१ मे च्या रात्री एका दुचाकीस्वार टोळक्याने शहरात धुमाकूळ घालून तीन ठिकाणी दगडफेक केली. त्यामध्ये तीन बसेसच्या काचा फुटल्या. या टोळक्याचा शोध घेत असताना संबंधित सहा जण तीन दुचाकीवरून बसस्थानकात शिरले. या वेळी पोलिसांना संशय आला. त्यांनी या टोळक्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहून भरधाव पसार होण्याच्या बेतात हे टोळके होते. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून बसस्थानकाच्या आवारातच या सहाही जणांना ताब्यात घेतले. या वेळी अँक्टीव्हा वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये विदेशी बनावटीशी साधम्र्य असलेला देशी कट्टा आणि चार जिवंत काडतूस पोलिसांना आढळून आले. एका स्प्लेंडर दुचाकीमध्ये लोखंडी रॉड आढळून आला. पोलिसांनी हे घातक शस्त्र आणि तीन दुचाकी जप्त करून सहा जणांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दरोड्याच्या प्रयत्नात असल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. त्यावरून वडगाव रोड ठाण्याचे एपीआय आनंद पिदूरकर यांनी संबंधित सहा जणांविरुद्ध दरोडा आणि घातक शस्त्र बाळगल्याचा गुन्हा नोंदविला. मात्र वाहन तोडफोडीत त्यांचा सहभाग नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
देशी कट्टय़ासह चार जिवंत काडतूस जप्त
By admin | Published: June 02, 2014 1:46 AM