शिरपूर ठाणे : कायदा, सुव्यवस्था राखणार तरी कशी ?वणी : जिल्ह्यातील वणी व शिरपूर या दोन पोलीस ठाण्यांकडे पोलीस विभागाचा नेहमीच डोळा असतो़ त्यामुळे येथे आपल्या मर्जीचे ठाणेदार असावे, याकडे पोलीस अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांचे लक्ष असते़ त्यामुळे शिरपूर पोलीस ठाण्याला चार महिन्यात चार ठाणेदारांचे चेहरे बघायला मिळाले आहे.वणी व शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वेकोलिच्या डझनभर केळसा खाणी आहेत़ त्यामुळे येथे ‘रॉयल्टी’ वसुलीचे मोठे लक्ष्य असते़ वरकमाईचे ठाणे म्हणून या दोन्ही पोलीस ठाण्यांचा जिल्ह्यात नावलौकिक झाला आहे़ प्रत्यक्षात नेमके काय होते, हे कुणालाच नाहीम नाही. येथील लोकप्रतिनिधींनाही त्यांना सर्वोतपरी सहकार्य करणारा ठाणेदार हवा असतो़ त्यामुळे तेसुद्धा आपल्या मर्जीचा माणूस या खुर्चीवर बसविण्यासाठी अटापिटा करतात, असा आजवरचा अनुभव आहे.शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदारपद सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याचे आहे़ या ठाण्याला परिसरातील ४०-४२ गावे जोडलेली आहेत़ या ठाण्याअंतर्गत उकणी, निलजई, नायगाव, बेलोरी, मुुंगोली, कोलगाव येथे वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत़ सोबतच या ठाण्याच्या हद्दीत ओव्हरलोड वाहतूकही सदासर्वकाळ सुरू असते़ त्यामुळे येथील ठाणेदारकीच्या पदासाठी राजकीयस्तरावर बोली लागत असल्याची चर्चा आहे.तीन वर्षांपूर्वी शिरपूर येथे सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी रुजू झाले. चार महिन्यांपूर्वी त्यांची बदली झाल्याने १७ फेब्रुवारीला ते शिरपूर येथून कार्यमुक्त झाले. त्यांच्या रिक्त जागी सहायक पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांना पाठविण्यात आले़ मात्र त्यांना केवळ २० दिवसातच येथून तडकाफडकी माघारी बोलविण्यात आले. त्यानंतर गेल्या ७ मार्चला सहायक पोलीस निरीक्षक दिनेश शेळके यांची शिरपूरला नियुक्ती झाली. त्यांनाही पदोन्नती झाल्याने अवघ्या सव्वा तीन महिन्यातच येथून बदलून जावे लागले़ आता त्यांच्या जगदीश मंडलवार यांना शिरपूरचे ठाणेदार करण्यात आले आहे. ते किती दिवस राहतात, याबाबत आता चर्चा सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
चार महिन्यात चार ठाणेदार
By admin | Published: July 05, 2014 11:50 PM