एसपींची पत्रपरिषद : राजकीय संबंध नाही यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत खुनाच्या चार घटना घडल्या. या घटनेचा राजकीय वादाशी कुठलाही संबंध नसून स्थानिक पातळीवरील भांडणातून या घटना घडल्याचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत सांगितले. दारव्हा तालुक्यातील रामगाव हरू येथे गुरुवारी सायंकाळी युवकाचा खून झाला. यातील आरोपी विजय गोबरसिंग पवार याला अटक केली आहे. त्यानंतर महागाव येथे चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात वैद्यकीय अहवालावरून खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी पित्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पांढरकवडा येथे शुक्रवारी सायंकाळी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या युवकाचा खून झाला. याही प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. घाटंजी येथे पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून झाला. यातही तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांचा नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीशी कुठलाही संबंध नाही किंवा इतर कोणत्या राजकीय हेवादाव्यातून या घटना घडल्या नाही, असे एम. राज कुमार यांनी सांगितले. गुरुवारी आर्णी तालुक्यातील अंजनखेड येथे माजी सरपंचांवर झालेला चाकू हल्लाही राजकीय वादातून झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यवतमाळ वाढत्या शहरातील चेन स्रॅचिंगमुळे पोलीस गस्त वाढविली जाणार आहे. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचा इतर पथकांशी समन्वय ठेवून प्रतिबंधक नियोजन केले जात आहे. शहराच्या प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, बसस्थानकात कॅमेरे लावण्याबाबत आढावा घेण्यात येईल. जास्तीत जास्त गणवेषधारी पोलीस रस्त्यावर कसे दिसतील, याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.काकासाहेब डोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख, पांढरकवडाचे ठाणेदार गुलाबराव वाघ उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
२४ तासांत चार खून
By admin | Published: February 26, 2017 1:12 AM