दुबार पेरणीचे संकट : पुसदमध्ये ४० टक्के पेरणी उलटलीपुसद : पुसद तालुका कोरड्या दुष्काळाच्या सावटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या बियाण्यापैकी ४० टक्के बियाणे उगवलेच नाही. तर उर्वरित भागात पाऊस नसल्यामुळे पीक करपले आहे. शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करणेही शक्य होणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. चारही नक्षत्र कोरडे गेल्याने भीषण दुष्काळ पडतो की काय, अशी चाहूल लागली आहे. खरिपातील पिकांच्या पेरणीचा कालावधी लोटल्यामुळे आता पाऊस आल्यानंतर कोणते पीक लावायचे हा प्रश्न आहे. यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा आणि पुनर्वसू ही पावसाची चारही नक्षत्रे कोरडी गेली आहे. आजपर्यंत अशी स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. पूस धरणातही केवळ १८ टक्के जलसाठा आहे. लवकरच दमदार पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष्य होणार आहे. पुसद तालुक्यासह उपविभागातील उमरखेड, महागाव, दिग्रस येथे गेल्या वर्षी पावसाने सर्वच रेकॉर्ड मोडले होते. अतिवृष्टीने हजारो हेक्टरमधील पीक खरडून गेले होते. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच वार्षिक सरासरीपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली होती.यावर्षी मात्र यापेक्षा उलट स्थिती आहे. केवळ १४ जून व ८ जुलै हे दोन दिवस वगळता पावसाचा शिरवाही या भागात पडला नाही. पावसाच्या आशेने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरड्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याचे चित्त सैरभैर झाले असून गोठ्यातील जनावरांना काय खाऊ घालायचे असा प्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकला आहे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस झाला तरी आता कोणत्या पिकाची पेरणी करावी, हा प्रश्न निर्माण होणार आहे. यापूर्वी अतिवृष्टीने शेतकऱ्याला प्रचंड आर्थिक संकट सोसावे लागले. सातत्याने आलेला पाऊस, त्यानंतर गारपीट, त्यामुळे मागील वर्षी खरीप, रबी आणि उन्हाळी या तिन्ही ऋतुतील पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांचे दुर्दैव येथेच थांबले नाही तर कसाबसा हाती आलेला माल बाजारपेठेत नेताच व्यापाऱ्यांनीही मनसोक्त पिळवणूक चालविली. शेतकऱ्याला लागवड खर्चही मिळाला नाही. अशा पिचलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी परिस्थितीवर मात करीत खरिपाच्या पेरणीची तयारी केली. यातही सुरुवातीलाच बोगस बियाण्यांनी शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. नाउमेद न होणाऱ्या शेतकऱ्यांनी याही परिस्थितीत कशीबशी तजबीज करीत खरिपाची पेरणी केली. काहींनी आर्थिक स्थिती नसतानाही कर्जाऊ रकमा घेऊन खते व बियाणे घरात आणून ठेवले. याही स्थितीत छातीला माती लावत काहींनी पावसाच्या आशेवर पेरणीला प्रारंभ केला. मात्र पाऊस आलाच नाही. सिंचनाची व्यवस्था असलेल्यांनी आपले पीक कसेतरी जगविण्याची धडपड सुरू केली. मात्र रुसलेले ढग शेत शिवारावर कधीच बरसले नाही. उलट तप्त उन्हामुळे जमिनीबाहेर आलेले अंकूरही करपले. या भीषण परिस्थितीचा सामना कसा करायचा, असा प्रश्न पुसद उपविभागातील शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे चाराटंचाई निर्माण झाली असून आता दुबार पेरणीसाठी शेतकरी आपल्या मौल्यवान पशुधनाची विक्री करीत असल्याची बाबही पुढे आली आहे. मागील हंगाम आणि यंदाच्या हंगामात शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचलेला असताना बँका मात्र त्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करायला तयार नाही. या स्थितीमुळे रणभूमीवर रथाचे चाक फसलेल्या कर्णासारखी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. निसर्ग आणि व्यवस्थेने केलेला प्रत्येक आघात सहन करण्यापलिकडचा आहे. मात्र अशाही प्रसंगात आपले अवसान न गमाविता निधड्या छातीने दोन हात करण्याची धडपड सुरू आहे. (प्रतिनिधी)
चारही नक्षत्र कोरडेच
By admin | Published: July 10, 2014 11:54 PM