वणी(यवतमाळ): दोन वेगवेगळ्या घटनेत नदीवर पोहण्यासाठी गेलेले चार तरूण वाहून गेले. ही घटना मंगळवारी स्वातंत्र्य दिनी सायंकाळी वणी तालुक्यातील नायगाव (खु.) व जुनाडा येथे घडली.
ही दोनही गावे वर्धा नदीच्या काठावर आहेत. पैकी जुनाडा येथून वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह तसेच नायगाव येथून वाहून गेलेल्या दोघापैकी एकाचा असे तीन मृतदेह शोध मोहिमदरम्यान आढळले असून एकाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. रितेश नत्थू वानखडे (१८) व आदर्श देवानंद नरवाडे (२०) दोघेही रा. भद्रावती ( जि. चंद्रपूर) अशी जुनाडा येथून वर्धा नदीत वाहून गेलेल्या तरूणांची नावे आहेत. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत.
नायगाव खुर्द येथील प्रविण सोमलकर (३६) दिलीप कोसरकर (४०) हे दोघे वर्धा नदीत वाहून गेले. यापैकी प्रविणचा मृतदेह सापडला असून दिलीपचा शोध घेतला जात आहे. १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनी सुटी असल्याने अनेकजण पर्यटनासाठी नदी तसेच धबधब्यावर जातात. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने नदीच्या जलपातळीत चांगलीच वाढली आहे. या प्रवाहात पोहण्याचा मोह न आवरता आल्याने ही दुर्घटना घडली.