यवतमाळ - ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे सातत्याने वाढत आहे. एका ठगाने चक्क जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्यांनाच पॉलिसीचे पैसे परत देतो असे सांगून दोन लाख २९ हजाराने गंडविले. विशेष म्हणजे ठगाचा फोन आल्यानंतर या अधिकाऱ्याने वारंवार त्याच्या बॅंक खात्यात पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या अधिकाऱ्याने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती प्रफुल्ल कडू यांनी भारतीय एक्सा कंपनीमध्ये जीवन सुरक्षा पॉलिसी काढली. या पॉलिसीचा अवधी २८ मार्च २०३१ ला संपुष्टात येणार आहे. दरम्यान २७ ऑगस्ट २०२२ रोजी कडू यांना मोबाईलवर कॉल आला. समोरच्या व्यक्तीने भारतीय एक्सा कंपनीचा ॲडव्हायजर चक्रवर्ती बोलतोय असे सांगितले. त्याने व्हॉटस्ॲप नंबर आहे का अशी विचारणा केली. कडू यांची खात्री पटावी म्हणून त्यांच्या पॉलिसीच्या पहिल्या पानाचा फोटोही त्यांना पाठविला. नंतर त्याने तुमच्या पॉलिसीचे पैसे परत येणार आहे, अशी बतावणी करून तीन हजार ३८० रुपये भरण्यास सांगितले. ठगाने दिलेल्या सीटी बॅंकेच्या खात्यात कडू यांनी पैसे जमा केले.
पुन्हा त्याने चार हजार ७८०, नंतर ४८ हजार ७११, त्यांना १ लाख ७५ हजार ५१० रुपये बॅंक खात्यात भरण्यास सांगितले. पैसे मिळतील या आशेवर कडू यांनी ही रक्कम जमा केली. पैसे आले नाही, उलट ठगाने चार लाख ६४ हजार रुपये आणखी भरण्यास सांगितले. तेव्हा संशय आल्याने ज्योती कडू यांनी बॅंकेच्या कर्मचाऱ्याशी संपर्क केला. त्याच्याकडून फसवणूक झाल्याची माहिती मिळाली. यानंतर कडू यांनी शहर पोलीस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची तक्रार बुधवारी दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
सुशिक्षितांनाच सावध राहण्याची गरज
ऑनलाईन व्यवहार हा सुशिक्षित व्यक्तीकडूनच केला जातो. मात्र ठगविणारे अशांनाच सहजरीत्या गंडवितात. त्यांच्याकडून पैसे उकळतात, असे अनेक गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले आहे. गेल्या काही दिवसात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सायबर सेलने प्रत्येक पोलीस ठाण्यात या गुन्ह्यासाठी रिसोर्स पर्सन बसविला आहे. वारंवार जनजागृतीही केली जाते. त्यानंतरही अनेक जण फसतात.