१३७ हेक्टर जमीन संपादित : २३४ शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप कळंब : यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला येणाऱ्या काळात गती देण्यासाठी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. कळंब तालुक्यातून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. या ट्रॅकवर येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करुन त्यांना मोबदला देण्यात आला आहे. त्यामुळे कळंब तालुक्यातून रेल्वेचा ट्रॅक क्लीअर असून त्याला हिरवी झेंडी मिळाली आहे. कळंब येथे शनिवारी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, भूसंपादन अधिकारी विजय भाकरे, तहसीलदार रणजित भोसले, नगराध्यक्ष दिगांबर मस्के, मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला व जमीन संपादन करण्यात आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. कळंब तालुक्यातील गलमगाव, गंगादेवी, खुटाळा, कामठवाडा, एकलासपूर, शिंगणापूर, मोहदरी, कळंब, थाळेगाव, घोटी, चापर्डा व बेलोणा या १२ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे ट्रॅकखाली येणार आहे. तालुक्यात भूसंपादनाची एकूण १२ प्रकरणे होती. यामध्ये २३४ शेतकऱ्यांची १३६.११ हेक्टर जमीन ट्रॅकखाली आलीत. त्यांना मोबदला म्हणून १९ कोटी ४३ लाख ८९ हजार ३५ रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आली. शेतकऱ्यांना मोबदला वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने रेल्वे विभागाला कामे सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला. (तालुका प्रतिनिधी) ऐकलं ते पूर्णत्वास जाणार कळंब शहरातून रेल्वे धावणार, असे बरेच वर्षांपासून सांगितले जायचे. प्रत्यक्षात कारवाई दिसत नव्हती. आता रेल्वेचे काम कुठल्याही क्षणी सुरु होवून गावातून रेल्वे जाईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जे ऐकलं ते पूर्णत्वास जाणार असे मनोगत अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन महसूल विभागाने ३ वर्षे चालणारे काम १० महिन्यात पूर्ण केले. वेळेपूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कौतुक केले. भूसंपादन अधिकारी विजय भाकरे यांच्या नेतृत्वात रवींद्र मानकर, विठ्ठल नारनवरे, भीमराव बांते, किशोर येंडे, विनोद उईके, नरेंद्र उके, निसार अहमद काझी या कर्मचारी चमूने भूसंपादनासाठी प्रयत्न केले.
कळंब तालुक्यातून रेल्वे ट्रॅकचा मार्ग मोकळा
By admin | Published: April 09, 2017 12:49 AM