यवतमाळ : ‘लोकमत’ समूहाचे संस्थापक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला शनिवार, २ जुलै रोजी प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने यवतमाळ येथे संगीतमय आदरांजलीसह गौरवग्रंथाचे प्रकाशन होणार असून, सुप्रसिद्ध गायिका आणि २०२२च्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा’ची मानकरी शाल्मली सुखटणकर (मुंबई) आणि सुप्रसिद्ध सतारवादक आणि २०२२च्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा’चे विजेता मेहताब अली नियाझी (दिल्ली) यांचा स्वरांजलीचा कार्यक्रम होणार आहे. जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
‘लोकमत’ समूहाचे संस्थापक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला २ जुलै रोजी प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने शनिवार, २ जुलै रोजी सकाळी ९.३० ते १०.३० यावेळेत यवतमाळमधील दर्डा नगरस्थित ‘प्रेरणास्थळ’ येथे संगीतमय आदरांजली होणार आहे. सकाळी १०.३० वाजता दर्डा मातोश्री सभागृहात ‘लोकमत’चे माजी संपादक व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्याद्वारे लिखित व संपादित गौरवग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या गौरवग्रंथाचे उत्कृष्ट मुखपृष्ठ चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील प्रसिद्ध चित्रकार भारत हरदास सलाम यांनी साकारले आहे. त्यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शनिवारी सायंकाळी प्रेरणास्थळ येथे रंगणार स्वरांजली
शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता प्रेरणास्थळ येथे सुप्रसिद्ध गायिका आणि २०२२च्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा’ची मानकरी शाल्मली सुखटणकर (मुंबई) आणि सुप्रसिद्ध सतारवादक आणि २०२२च्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा’चे विजेता मेहताब अली नियाझी (दिल्ली) यांचा स्वरांजलीचा कार्यक्रम रंगणार आहे.
शाल्मली सुखटणकर ही प्रसिद्ध मराठी गायिका असून, ‘चांदोबा’ या गाण्याने ती चर्चेत आली. तिने डॉ. वैजयंती जोशी यांच्याकडे वयाच्या पाचव्या वर्षापासून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. २००९मध्ये झी मराठीवरील रिॲलिटी शो ‘सारेगमप लिटल चॅम्प’मध्ये पहिल्या फेरीत तिची निवड झाली आणि पहिल्या सहा स्पर्धकांपैकी ती एक होती. या शोमुळे गायनाबद्दल तिच्या जाणिवा समृद्ध झाल्या आणि पूर्णवेळ या क्षेत्रात ती ओढली गेली. शालेय शिक्षणानंतर ती मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये कला शाखेत गेली. तिने वर्षा भावे यांच्याकडून गायनाचे धडे घेतले. त्यानंतर तिला लवकरच ‘हसले मनी चांदणे’ या मराठी चित्रपटात पार्श्वगायिका म्हणून पहिला ब्रेक मिळाला.
सुप्रसिद्ध सतारवादक मेहताब अली नियाझी हे भिंडी बाजार घराण्याचे सतारवादक आहेत. ते प्रसिद्ध सतारवादक उस्ताद मोहसीन अली खान यांचे पुत्र असून, त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून मेहताब यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मेहताब परफॉर्म करत आहेत. पंडित बिरजू महाराज यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात मेहताब यांनी वयाच्या सहाव्या वर्षी पहिले सादरीकरण केले. त्यांच्या अतुलनीय सादरीकरणामुळे प्रेक्षकही थक्क झाले होते. आज त्यांची नवोदित सतारवादक म्हणून देशभरात ख्याती आहे. विविध शहरांत त्यांचे सादरीकरण झाले आहे. मेहताब यांनी अनेक आंतरराष्ट्रीय ‘कॉन्सर्ट’मध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
२ जुलै रोजी यवतमाळ येथे होणारे कार्यक्रम
- संगीतमय आदरांजली :
वेळ : सकाळी ९.३० ते १०.३०
स्थळ : प्रेरणास्थळ, दर्डा नगर
- गौरवग्रंथ प्रकाशन समारंभ :
वेळ : सकाळी १०.३० वाजता
स्थळ : दर्डा मातोश्री सभागृह
- स्वरांजली :
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : प्रेरणास्थळ, दर्डा नगर