लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: अलीकडील काळात सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचे फॅड भलतेच वाढले आहे. त्यानुसारच येथील बाभूळगाव रोडवरील प्रेमनगरमध्ये शुकवारी वाढदिवस साजरा करण्यासाठी तिघे मित्र एकत्रित आले होते. वाढदिवसानिमित्ताने केकसह इतर साहित्य सज्ज ठेवण्यात आले होते, परंतु किरकोळ कारणावरुन जमलेल्या तिघांमध्ये अचानक बाचाबाची झाली आणि काही क्षणातच या मित्रांनी केक कापण्यासाठी आणलेल्या चाकूने एकमेकांवर हल्ला चढविला. या घटनेत एकाच्या दोन्ही बोटावर तर दुसऱ्याच्या पायावर आणि तिसऱ्याच्या पोटावर वार झाले. याप्रकरणी तिघांविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर एकाला उपचारासाठी यवतमाळला हलविले आहे. (Friends had come to cut the birthday cake ... but stabbed each other ..)बाभूळगाव रोडवरील प्रेमनगरमध्ये हे तीन अल्पवयीन तरुण वाढदिवस साजरा करण्यासाठी शुकवारी रात्री नऊच्या सुमारास जमले होते. वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी आणलेल्या खाद्यपदार्थावर ताव मारत हे तिघेही गप्पा मारत होते. अचानक या तिघांत किरकोळ कारणावरुन बाचाबाची सुरु झाली आणि काही समजायच्या आतच एकाने वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मित्रावर चाकूने हल्ला चढविला.
या घटनेत मित्राच्या दोन्ही हाताच्या बोटावर वार करण्यात आले. आपल्या मित्रावर चाकूने हल्ला होत असल्याने दुसरा मित्र त्याला वाचविण्यासाठी पुढे आला असता, संतापलेल्या पहिल्या मित्राने त्याच्या पायावर चाकूने हल्ला केला. यात तो जखमी झाला. यानंतर जखमी झालेल्या दोन्ही मित्रांनी मिळून हल्ला करणाऱ्या मित्राच्या हातातून चाकू हिसकावून घेत, त्याच चाकूने त्याच्यावर वार केले. यामध्ये त्याच्या पोट आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला यवतमाळ येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कळंब पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरुन तिघांवरही विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार अजित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.